एकीकडे गणेश आगमनाच्या मिरवणुकांची धामधुम सुरू झालेली असतानाच दुसरीकडे मंडप परवानगी नाकारलेल्या २९० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अडचणीत सापडली असून पालिकेकडून मिळू न शकलेली योग्य ती सूचना आणि अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यास अडचणी आल्याचा दावा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात येत आहे.

वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या मंडपांना परवानगी देऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. असे मंडप दृष्टीस पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पालिकेने यंदा मंडप परवानगीबाबत कडक नियम केले होते. तसेच गणेशोत्सव मंडळांकडून मंडप परवानगीसाठी यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. आवश्यक ती कागदपत्रे सादर करणाऱ्या, तसेच स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर करण्यात आल्यानंतर पालिकेकडून २२९० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगी देण्यात आली. मात्र मंडप परवानगी नाकारलेल्या मंडळांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या मुदतीमध्ये कागदपत्रे सादर करण्यास २९० मंडळे असमर्थ ठरली. त्यामुळे या मंडळांना मंडप परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

पुन्हा अर्ज सादर करण्यासाठी दिलेली मुदत उलटून गेल्यानंतर तात्काळ पालिकेने ऑनलाईन सेवा बंद केल्याचा आरोप गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात येत आहे. विनापरवानगी मंडप उभारल्यास कारवाई होऊ शकते या भिती पोटी मंडळांचे कार्यकर्ते पालिकेच्या कार्यालयांमध्ये खेटे घालत आहेत. पालिकेने आवश्यक ते कागदपत्रे स्वीकारावी आणि मंडप परवानगी द्यावी, अशी मागणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

 

Story img Loader