|| दिशा खातू
प्रतीकात्मक विसर्जन करून मूर्तीची जपणूक करण्यावर भर
गणेशोत्सवातील प्रदूषण टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध पर्याय अमलात येत आहेत. पाण्याचे प्रदूषण न करता विसर्जित होणाऱ्या मूर्ती हा पर्याय त्यापैकीच एक.. आता यापुढे एक पाऊल टाकत मूर्तीचे केवळ प्रतीकात्मक विसर्जन करण्याचा पर्यायही रुजत आहे. धातूच्या मूर्तीचे पूजन करण्यासोबतच पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीची उंचीही कमी करण्याचा मार्गही अनेकांनी अवलंबला आहे.
गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनी आणि जलप्रदूषण हा सार्वत्रिक चिंतेचा विषय आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणाऱ्या मूर्त्यांमध्ये अविघटनशील घटक, तसेच रासायनिक रंग असल्याने विसर्जनानंतर जलप्रदूषण होते. त्यामुळे काही वर्षांपासून शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्त्यांना प्राधान्य देण्यात येत होते. परंतु आता गणेशभक्तांनी त्याही पुढे जाऊ न विसर्जनाची आवश्यकता नसलेल्या गणेशाची स्थापना करण्यास सुरवात केली आहे. धातू, चांदी किंवा संगमरवराच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायची आणि नंतर त्याचे घरातच प्रतीकात्मक विसर्जन करून पुन्हा देव्हाऱ्यात ठेवायची, अशी ही संकल्पना आहे. अनेक मुंबईकर ही संकल्पना राबवत आहेत.
अनुजा जोशी-शिर्के या दरवर्षी संगमरवराच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. मात्र कुठलीही विसर्जन मिरवणूक न काढता घरीच गणपतीचे प्रतीकात्मक विसर्जन करतात. यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही, की जलप्रदूषण होत नाही असे त्यांनी सांगितले. बोरिवलीत राहणाऱ्या वेदांती गांधी यांनीदेखील चांदीची गणेशमूर्ती बनवून घेतली आहे. धार्मिक परंपरेप्रमाणे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून घरीच प्रतीकात्मक विसर्जन केले जाते असे त्यांनी सांगितले.
शाडू मातीच्या आणि कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती गेल्या काही वर्षांपासून आणल्या जात आहेत. आता गणेशमूर्तीची उंची कमी ठेवण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी शाडूच्या मूर्ती होत्या आणि त्याचा आकार लहान होता. त्यामुळे आम्ही आता पुन्हा शाडूमातीच्या गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचा आकारही कमी ठेवतो, असे विलेपार्ले येथे राहणारे शुभंकर दळवी यांनी सांगितले. कमी उंचीची मूर्ती असल्याने त्याचे विसर्जनही लवकर होते असे त्यांनी सांगितले. चेंबूर येथे राहणारे डॉ. विजय सांगोले मागील १५ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. दरवर्षी घरीच कृत्रिम हौद बनवून ते छोटय़ा मूर्तीचे विसर्जन करतात. विसर्जनानंतर हौदाच्या तळाला बसलेल्या मातीचा वापर करून पुढच्या वर्षी श्रीगणेशाची मूर्ती आकाराला येते, असे ते म्हणाले.