मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे मुंबईतील तीन गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होऊ शकले नाही. आता या वादाला राजकीय किनार असल्याची चर्चाही रंगू लागली आहे. कांदिवली येथील गणेशमंडळाचे कार्यकर्ते हे शिवसेना (ठाकरे) पक्षाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणी तब्बल २४ दिवसांनंतरही तोडगा निघत नसल्याची चर्चा आहे. ठाकरे आणि भाजपा यांच्यातील वादामुळे या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत नसल्याची चर्चा सुरू आहे.

माघी गणेशोत्सवाला २४ दिवस झाले तरी पश्चिम उपनगरातील तीन मंडळांच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. बोरिवली पूर्वेकडील कार्टर रोडचा गणपती, डहाणूकरवाडी येथील कांदिवलीचा श्री आणि कांदिवलीतील चारकोपचा राजा या तीन मंडळांनी कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करण्यास नकार दिल्यामुळे अद्यापही गणेश मूर्तींचे विसर्जन होऊ शकलेले नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे या विषयात पालिका प्रशासनाने कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका बजावली. मात्र मूर्तींची उंची जास्त असल्यामुळे तीन मंडळांनी त्या तलावात विसर्जन करण्यास नकार दिला. बोरिवलीच्या कार्टर रोड येथील मंडळाकडे मूर्ती ठेवण्यास जागा नसल्यामुळे त्यांनी ही मूर्ती पुन्हा एकदा मूर्तिकाराकडेच पाठवली आहे. कांदिवलीचा श्री मंडळाने आपली मूर्ती मंडपालगतच्या मैदानात झाकून ठेवली आहे तर चारकोपचा राजा या मंडळाने मूर्ती अज्ञातस्थळी झाकून ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नी तोडगा निघेल या आशेवर ही मंडळे राज्य सरकारकडे डोळे लावून बसली आहेत.

गणेशमूर्ती विसर्जनाचे राजकारण होत असल्याच्या मुद्यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. कांदिवली हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून मंडळांचे कार्यकर्ते हे ठाकरे गटाशी संबंधित आहेत. तेथील एका मंडळाचा पदाधिकारी हा ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचा पुत्र आहे. त्यामुळे यावर तोडगा निघत नसल्याची चर्चा आहे.

एका मंडळाची मूर्ती तलावात अर्धवट विसर्जित झाली होती. त्यामुळे कृत्रिम तलावात विसर्जन केले आणि मूर्तीची विटंबना झाली तर मंडळाचे नाव बदनाम होईल अशी भीती कांदिवलीचा श्री मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रश्नी आम्ही कोणत्याही पक्षाकडे मदत मागितली नाही. मात्र राज्य सरकारला या प्रश्नी तोडगा काढणे शक्य आहे. मंडळांशी चर्चा काढून हा तोडगा काढावा अशी आमची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

गणेशोत्सवात आम्ही राजकारण आणत नाही. आमच्या मंडळात सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येतात. आम्ही कोणत्याही पक्षाकडे गेलेलो नाही. मात्र समन्वय समितीच्या मार्फत आम्ही राज्य सरकारला याप्रश्नी तोडगा काढण्याची विनंती केली आहे, असे मत चारकोपचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मात्र त्यावर अद्याप समितीला काहीही उत्तर आलेले नाही. याबाबत बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, धार्मिक विषयात मी राजकारण आणत नाही. मी पहिल्याच दिवशी माझ्या मतदार संघातील गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन आलो. सातव्या दिवशी विसर्जनाला पोलिसांनी नकार दिल्यानंतर पोलिस आणि मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली व कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र कांदिवलीतील दोन मंडळांनी कृत्रिम विसर्जनाला नकार दिला. त्यात कोणी राजकारण आणत असेल तर त्याला अर्थ नाही. त्यामुळे या दोन मंडळांची इच्छा असेल आणि त्यांनी संपर्क साधला तर मी विसर्जनाच्या तयारीचे प्रशासनाला आदेश देईन.

Story img Loader