मुंबई : माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने दिल्यामुळे निर्माण झालेला विसर्जनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पश्चिम उपनगरातील कांदिवली व बोरिवली परिसरातील चार मोठ्या मंडळांच्या उंच मूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. कांदिवली पूर्वेकडील कांदिवलीचा राजा, बोरिवली पूर्वेकडील कार्टर रोडचा गणपती, डहाणूकरवाडी येथील कांदिवलीचा श्री आणि कांदिवलीतील चारकोपचा राजा या चार मंडळांच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. या मंडळांच्या मूर्ती विविध ठिकाणी झाकून ठेवण्यात आल्या असून या मूर्तींच्या विसर्जनासाठी आता गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारला साकडे घातले आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती तयार करणे, विक्री करणे आणि विसर्जन करण्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही मार्गदर्शक त्तत्वे योग्य ठरवली आहेत. त्यामुळे, माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेशमूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. मात्र तरीही दीड दिवसांच्या व पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मुंबईत विविध ठिकाणी विशेषतः पश्चिम उपनगरात झाले. त्यामुळे शाडूची माती तयार करणाऱ्या मूर्तिकारांनी पालिकेकडे व पोलिसांकडे आक्षेप घेतले होते. त्यानंतर सातव्या दिवशीच्या विसर्जनाला ७ फेब्रुवारीला समुद्र किनाऱ्यांवर मूर्ती विसर्जन करण्यास पालिका प्रशासनाने मंडळांना परवानगी दिली नाही. त्यामुळे बहुतांशी मंडळांच्या गणेशमूर्ती मंडळात परत पाठवाव्या लागल्या. मंडपांमध्ये या मूर्ती झाकून ठेवण्यात आल्या आहेत. 

अकराव्या दिवशीच्या विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने पश्चिम उपनगरात चार ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच गणेशोत्सव मंडळांच्या सूचनांनुसार या कृत्रिम तलावांची खोलीही वाढवण्यात आली. मात्र या तलावांमध्ये विसर्जन करण्यास कांदिवली, बोरिवलीतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी नकार दिला आहे. पालिकेने तयार करून दिलेले कृत्रिम तलाव हे जेमतेम १६ फूट खोल असून गणेशमूर्ती या १८ ते २० फुटांच्या आहेत, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच या तलावांची रुंदीही फार नाही. त्यामुळे एकावर एक मूर्ती विसर्जित करण्यास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे.

मंडळांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे चार मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होऊ शकलेले नाही. मंडळांनी आपापल्या गणेशमूर्ती विविध ठिकाणी झाकून ठेवल्या आहेत. या मूर्तींची विटंबना होऊ नये, मूर्तींच्या ध्वनिचित्रफिती प्रसारित होऊ नये म्हणून मंडळांनी विशेष काळजी घेतली आहे. एका मंडळाची मूर्ती ही मूर्तिकाराच्या कारखान्यात ठेवण्यात आली आहे. सध्या या मूर्ती सांभाळून ठेवणे व त्यांचे योग्य पद्धतीने विसर्जन करणे याला प्राधान्य असल्याचे मत एका मंडळाच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. तसेच कांदिवली येथील डडाणूकरवाडी तलाव हा विसर्जनासाठीचाच तलाव आहे. त्यामुळे या तलावात मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रश्नी आता गणेशोत्सव समन्वय समितीनेही पुढाकार घेतला आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गणेशोत्सव समन्वय समितीने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. याबाबत समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आगामी भाद्रपद उत्सवाचा विचार करून निर्णय घ्यावा व विसर्जनाचा तिढा सोडवावा, अशी मागणी केली आहे. शाडूच्या मातीच्या मूर्तींसाठी पाठपुरावा करणारे श्री गणेश मुर्तिकला समितीचे वसंत राजे यांनी म्हटले आहे की, पालिकेने यंदाच्या माघी उत्सवापूर्वीचे गणेशोत्सव मंडळांकडून हमीपत्र घेतले होते. त्यामुळे आता मंडळांनी धर्माच्या नावे बोलू नये. पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे.