मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) पीओपी बंदीच्या सुधारित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना काही महिन्यांपूर्वी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाद्रपदातील गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती घडविण्याकडे गणेशोत्सव मंडळांचा कल वाढत आहे.

सीपीसीबीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार पर्यावरणास हानीकारक असलेल्या पीओपी गणेशमूर्ती साकारणे, त्यांची विक्री करणे आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही मार्गदर्शक त्तत्वे योग्य ठरवली आहेत, असे नमूद करून यंदा माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेशमूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. पीओपी गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका असे आदेश देण्यात आले होते. या आदेशामुळे माघी गणेश जयंती उत्सवातील पीओपी गणएशमूर्तींचे समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जन करण्यास पालिका प्रशासनाने मंडळांना परवानगी नाकारली होती. दरम्यान, गोरेगावमधील मिठानगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशमूर्ती मंडपस्थळी साकारून प्रतिष्ठपना करते. मागील अनेक वर्ष हे मंडळ पोओपीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करीत आहे. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव २०२५ साठी लागू केलेली नियमावली लक्षात घेऊन मंडळाने यंदा पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणस्नेही कागदी गणेशमूर्ती साकारण्यात येणार आहे. ही पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती दरवर्षीप्रमाणे मंडपातच साकारण्यात येणार आहे, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास परवानगी द्यावी

मंडळातर्फे यंदा प्रथमच पर्यावरणस्नेही गणेसमूर्ती साकारण्यात येणार आहे. यामुळे आमच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास पालिकेने परवानगी द्यावी. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश पालकर यांनी सांगितले.

गणेशोत्सव समन्वय समितीचा पुढाकार

पीओपी बंदीच्या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही पुढाकार घेतला आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या समन्वय समितीने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. याबाबत समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भाद्रपदमधील गणेशोत्सवाचा विचार करून निर्णय घ्यावा व विसर्जनाचा तिढा सोडवावा, अशी मागणी काही महिन्यांपूर्वी केली आहे.

माघी गणेशोत्सवापासून नियमांचे पालन

सीपीसीबीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पर्यावरणास हानीकारक असलेल्या पीओपी गणेशमूर्ती बनविणे, त्यांची विक्री करणे आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही मार्गदर्शक त्तत्वे योग्य ठरवली आहेत, असे नमूद करून यंदाच्या माघी गणेश जयंतीपासून पीओपी बंदीबाबत नियमांचे पालन करण्यास सुरुवात झाली आहे.