गणेशमूर्तीच्या पाद्यपूजन, मातीपूजनाचाही बडेजाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलेश अडसूळ, मुंबई

गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने मंडळाचे शक्तिप्रदर्शन करून अन्य गणेशोत्सव मंडळांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या मंडळांमध्ये आता गणेशमूर्तीच्या आगमनापूर्वीच्या पाद्यपूजन, पाटपूजन, मातीपूजन इतकेच नव्हे तर ‘ट्रॉली’पूजनावरूनही चढाओढ सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वीच समाजमाध्यमांवर आपल्या मंडळाची चर्चा निर्माण करण्यासाठी होणारे हे प्रयत्न गणेशोत्सवाचे ‘बाजारीकरण’ होण्याचा प्रकार असल्याचा सूर समाजातून उमटत आहे.

आतापर्यंत काही मोठी गणेशोत्सव मंडळे आपल्या गणेशमूर्तीच्या पाद्यपूजनाचे सोहळे आयोजित करत होती. परंतु, आता लहान लहान मंडळांनीही या ‘पूजन’ स्पर्धेत उडी मारली आहे. या सोहळ्यांच्या निमित्ताने आकर्षक प्रकाश योजना, मंडप, फु लांची आरास, भटजींचे मानधन, स्थानिक नेत्यांसह देणगीदारांचा सन्मान, फटाके  आणि पथकांमागून पथकांची सलामी असा धुमधडाका मंडळ उडवून देतात. समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रत्येक मंडळ प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याआधीच या सोहळ्यांच्या माध्यमातून मंडळांची प्रसिद्धी करत आहेत.

अनेक मंडळांमध्ये पाटपूजन, मातीपूजन, ट्रॉलीपूजन के ले जाते, तर काही मंडळांमध्ये थेट गणेश मूर्तीचे पाय (तळपाय) आणून पुजले जातात. वास्तविक मूर्तीचे पाय मांडी, गुडघा आणि तळपाय अशा एकत्रित स्वरूपात असतात. परंतु मंडळांच्या हट्टापायी मूर्तिकारांना सांध्यापासून तळपाय वेगळा कापून द्यावा लागतो. विशेष म्हणजे हा पाय पुन्हा गणेश मूर्तीना जोडणे शक्य नसल्याने तो पूजेनंतर काहीच कामाचा नसतो. हे लक्षात आल्यानंतर काही मंडळांनी मातीपूजन सुरू के ले आहे. वास्तविक अशा पाय किंवा मातीपूजनाला धर्मशास्त्रीय आधार नाही.

गिरगावातील पाटकर बंधू गेली ७० वर्षांहून अधिक काळ गणेश मूर्ती घडवत आहेत. पर्यावरणपूरक ‘गिरगावचा राजा’ घडवणारे पाटकर सांगतात, ‘‘७० वर्षांत असे सोहळे कधीच पहिले नाही. मूर्ती घडवताना पाटाला, जागेला श्रीफळ वाहून मान देण्याची पद्धत पूर्वापार रूढ आहे. आजही आम्ही त्याच पद्धतीचा अवलंब करतो. परंतु मंडळामंडळांमधील चढाओढीमुळे तरुण मुलांनी नव्यात पद्धती सुरू केल्या आहेत. या स्पर्धेच्या भावनेतून पुजेचा आता ‘इव्हेंट’ होऊ  लागला आहे.’’

नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती घडवणारे सतीश वाळीवडेकर यांनीही हे सोहळे निर्थक असल्याचे सांगितले. ‘त्यांच्या मते, आपले मंडळ कसे प्रसिद्ध होईल यासाठी केलेली ही धडपड आहे. पूर्वी आपल्याकडे कुंभार, सोनार समाजातील मंडळी मूर्ती घडवत. तेव्हा पारंपरिक पूजन व्हायचे. परंतु आता सुरू झालेल्या पाद्यपूजन सोहळ्यांना गर्दी जमवण्याकडेच मंडळांचा कल असतो,’ असे ते म्हणाले.

दा. कृ. सोमण यांची टीका

‘पाद्यपूजन ही संकल्पना चुकीची नाही. परंतु गुरूचे पाद्यपूजन करायचे म्हणजे त्याचे पाय काढून पुजायचे का,’ असा सवाल ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केला आहे. ‘मूर्ती घडवताना पूजा करून श्रद्धापूर्वक नमस्कार करणे गैर नाही. परंतु त्या पूजा वैयक्तिक स्वरूपात व्हायला हव्या. पाद्यपूजनाच्या नावाखाली जाहिरातबाजी करून गर्दी गोळा करणे, अत्यंत चुकीचे आहे,’ असे ते म्हणाले.

गणेशगल्लीचा पायंडा

गणेशल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने १९७७ साली पाद्यपूजनाला सुरुवात केली. ज्येष्ठ मूर्तिकार दीनानाथ वेलिंग यांनी त्या वर्षी मुंबईतील तेव्हाची सर्वात मोठी गणेश मूर्ती साकारली होती. तेव्हापासून गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गणेशाचे पाद्यपूजन करण्याची पद्धत या मंडळात आहे. परंतु तेव्हा कोणताच गाजावाजा नव्हता. के वळ देवाला गाऱ्हाणे घालून पूजा के ली जात असे. याबाबत विचारणा के ली असता मंडळाचे सचिव स्वप्निल परब म्हणाले, ‘‘ ४० वर्षांहून अधिक काळ पाद्यपूजन गणेशगल्लीमध्ये सुरू आहे. पूर्वी ते पारंपरिक स्वरूपात के ले जायचे. परंतु ढोल पथकांचे तरुणांना आकर्षण असल्याने ते वाजवले जातात.’’