मुंबईमधील गणेश मूर्तिकारांमध्ये पाटकर कुटुंबियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. फार पूर्वी वासुदेव पाटकर गोव्यामध्ये गणेशमूर्ती साकारायचे. नंतरच्या काळात मुंबईमध्ये गणेशमूर्तीना मागणी वाढू लागली. त्यामुळे काही मंडळींच्या आग्रहावरून ते मुंबईत आले आणि शाडूच्या मातीपासून सुबक गणेशमूर्ती घडवू लागले. त्यांची मुले नारायण, गणेश आणि विष्णू हेही त्यांना मदत करू लागले. हळूहळू या तिघांनी मूर्तिकला आत्मसात केली आणि तेही मूर्तिकार म्हणून नावारूपाला आले. आजघडीला गणेश आणि विष्णू हयात नाहीत. मात्र पाटकर परिवाराची पुढची पिढी याच क्षेत्रात कार्यरत आहेत.
नारायण यांचे पुत्र अविनाश यांनी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’मधून मूर्तिकलेचे शिक्षण घेतले आणि तेथेच एक वर्ष प्राध्यापक म्हणून कामही केले. त्यानंतर ते वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विभागीय नक्षीकाम केंद्राच्या सेवेत रुजू झाले. नोकरी सांभाळून ते कुटुंबाच्या पारंपरिक मूर्तिकाम व्यवसायातही लक्ष घालत होते. शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारण्यात त्यांचा हातखंडा. शाडूची माती पर्यावरणस्नेही असली तरी ती पाण्यात विरघळण्यास वेळ लागतो आणि विरघळल्यानंतर काही अंशी त्याचा गाळ तयार होतो. त्यामुळे २००३ मध्ये त्यांनी कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती साकारण्याचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाला. शाडूच्या गणेशमूर्तीप्रमाणे कागदाच्या लगद्याची मूर्तीही सुबक बनली.
सुरुवातीला केवळ दोन-तीन मूर्तीच ते घडवीत होते. त्यांच्याकडे नियमितपणे गणेशमूर्ती घेण्यासाठी येणाऱ्यांना त्यांनी कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्तीचे महत्त्व पटवून सांगितले. वजनाला हलकी, पटकन विरघळणारी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी कागदाच्या लगद्याची गणेशमूर्ती अनेक भाविकांना भावली आणि यंदा मागणीनुसार त्यांनी कागदाच्या लगद्याच्या २५ मनमोहक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. त्यामध्ये १४ फूट उंच काळबादेवीचा राजा आणि आठ फूट उंच सायनच्या सार्वजनिक गणेसोत्सवाच्या गणेशमूर्तीचा समावेश आहे.
अविनाश पाटकर यांचे अख्खे कुटुंब सध्या गणेश कार्यशाळेत मूर्ती साकारण्यात रमले आहेत. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे अविनाश यांची पत्नी ज्योती, मुलगी गौतमी, बंधू आशीष, त्यांची पत्नी शिल्पा आणि त्यांचा १३ वर्षांचा मुलगा पीयूष यांची गणेशमूर्ती घडविण्यासाठी धावपळ सुरू आहे. यापैकी कुणी रंगकामात, तर कुणी नक्षीकामात तरबेज आहे. थोडक्यात ही सर्व मंडळी वासुदेव पाटकर यांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा