ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेण्याची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर या शरणागतीमागील कवित्व आता पुढे येऊ लागले आहे.  पालकमंत्री गणेश नाईक आणि पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड या जिल्ह्य़ातील दोन मातब्बर नेत्यांमध्ये माघारीच्या मुद्दयावरुन झडलेल्या चकमकींचे किस्से एव्हाना ठाण्यातील राजकीय वर्तुळात मोठय़ा चवीने चर्चिले जाऊ लागले आहेत. आव्हाडांच्या व्यासपीठावर उपोषण करुन मी चुक केली, असा टोला लागवत हे उपोषण राजकीय दबावामुळे मागे घ्यावे लागले, अशी प्रतिक्रीया आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. हे उपोषण दहा दिवस चालविण्याचीही आमची तयारी होती. मात्र, राजकीय दबावापुढे आंदोलन मोडीत निघाले, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीत रंगलेल्या उपोषणनाटय़ाविषयी ही प्रतिक्रीया बोलकी मानली जात आहे.  
हे उपोषण सोडावे की नाही यावरुन नाईक आणि आव्हाड या दोन नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद होते. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसमोरच या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या, असे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने लगेच उपोषण सोडल्यास चुकीचा संदेश जाईल, असे आव्हाड गटाचे म्हणणे होते. मात्र, मुख्यमंत्री स्वत बोलण्यास तयार असल्याने उपोषण सोडावे, असा आग्रह पालकमंत्र्यांनी धरला. तसेच यासंबंधी ठाणे जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यास मुख्यमंत्री तयार असल्याने जास्त ताणू नये, असे नाईकांचे मत होते.  
उपोषणकर्त्यांमध्ये त्यांचे खासदार पुत्र संजीव नाईक तसेच आव्हाडांच्या पत्नी ऋता यांचाही समावेश होता. ठाणे तसेच मुंब्रा परिसरात एकत्रित पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने या मुद्दयावर लगेच माघार घेणे योग्य ठरणार नाही, असे आव्हाडांचे म्हणणे होते. त्यामुळे आव्हाडांनी नाईकांच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त करत काहीही झाले तरी उपोषण सोडायचे नाही, असा पवित्रा घेतला. यावरुन हे दोन्ही नेते कमालिचे आक्रमक झाल्याचे उपस्थित सुत्रांनी सांगितले. क्लस्टरचा मुद्दा ठाणे, मुंब्रासाठी निर्णायक आहे. तुमचे त्यावरुन काही अडणार नाही. इथे आम्हाला लोकांना तोंड द्यायचे आहे, अशा शब्दात आव्हाडांनी नाईकांना सुनावल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यावर नाईकही आक्रमक होत सरकारची भूमीका मांडत होते.
या मुद्दयावरुन खासदार संजीव नाईक आणि ऋता आव्हाड यांच्यातही शाब्दीक चकमक घडल्याची चर्चा आहे. याविषयी जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता ऋता बोलली आहे, आता मी काय बोलू, असे ते म्हणाले. पालकमंत्री नाईक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा