उत्तर प्रदेश आणि बिहारहून येथे येऊन वास्तव्य करीत असलेले नागरिक हे आपले हक्काचे मतदार असून लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणजे ३० एप्रिलपर्यंत त्यांना त्यांच्या गावी जाऊ देऊ नका, असे बजावतानाच ३० एप्रिलनंतर त्यांच्या रेल्वेतिकिटाचे आरक्षण आपण मिळवून देऊ, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक आणि खासदार संजीव नाईक यांनी सोमवारी कार्यकर्ता मेळाव्यात देऊन एकच धमाल उडवून दिली.
महाराष्ट्रात वास्तव्यास आलेल्या ‘मतदारभाईं’ची संख्या ठाणे जिल्ह्य़ात लक्षणीय आहे. लोकसभेची निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता असून या महिन्यातच महाराष्ट्रात राहात असलेले उत्तर प्रदेश व बिहारचे बहुसंख्य नागरिक गावी जात असतात. त्यामुळे ही कथित हक्काची मते गमावण्याच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रासले असून त्यामुळेच ही ग्वाही नाईकांनी दिली आहे.
कोकणातले मतदार गावी गेले तर त्यांना परत आणता येते. बिहार, उत्तर प्रदेशात गेलेल्या मतदारांना परत कसे आणायचे, असा सवाल करत गणेश नाईक यांनी रेल्वे आरक्षणाचे हे गाजर दाखवले. खासदार संजीव नाईक यांनीही आपल्या भाषणात बिहारी आणि उत्तर भारतातील मतदारांचा उल्लेख ‘हक्का‘चे म्हणून केलाच शिवाय त्यांच्या गावच्या प्रवासाचे नियोजन करु, असे आश्वासनही दिले. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी गणेश नाईक आणि खासदार संजीव नाईक यांनी सोमवारी ठाण्यातील टीपटॉप प्लाझा सभागृहात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा तातडीचा मेळावा घेतला. आमदार जयदेव गायकवाड आणि निरंजन डावखरेही निमंत्रित होते. संजीव नाईक यांनी निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक वाचून दाखविले आणि मतदारांना गावी जाऊ देऊ नका, असे आवाहन केले. येत्या २७ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून २५ ते ३० एप्रिलपर्यत प्रत्यक्ष मतदान होईल. या काळात बरेचसे मतदार गावी जातात. उत्तर प्रदेश तसेच बिहारमधील मतदार हे आपल्या हक्काचे आहेत, त्यामुळे त्यांना गावी जाऊ देऊ नका, असे आवाहन संजीव नाईक यांनी केले. मतदार यादीचा अभ्यास करा. आपल्या हक्काच्या मतदाराच्या नावावर हिरव्या रंगाची, तर विरोधातील मतदारावर लाल रंगाची शाई मारा. उत्तर प्रदेश आणि बिहारचे मतदार हे आपल्या हक्काचे आहेत. त्यांना आतापासूनच भेटा, त्यांना ३० एप्रिलनंतर गावी जाण्याची विनंती करा. त्यांना रेल्वे आरक्षण मिळत नसेल तर ते आपण देऊ, असे आश्वासन नाईक यांनी दिले. या आश्वासनावर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा