लोकसभा निवडणुकांची चाहूल लागताच सर्वच पक्षांनी आंदोलनाचा धडाका लावला असून गुरुवारी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारात इमू व्यावसायिकांच्या प्रश्नावरून भारतीय विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इमू व्यावसायिकांचा प्रश्न तसा जुना असून या प्रश्नावर यापूर्वीही आंदोलने झाले आहेत. असे असताना शिवसेनेने अचानक या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उगारल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.
जिल्ह्य़ात सहा वर्षांपूर्वी इमू पालनाचे फॅड बोकाळू लागले. शहामृग प्रजातीतील या पक्षाचे एक अंडे दोन ते तीन हजार रुपयांना विकले जाते. या पक्षाच्या मटणास किमान ७०० रुपये किलो भाव मिळतो, या प्रचाराला भुलून अनेकांनी गुंतवणूक केली. मात्र या व्यवसायात शुद्ध फसवणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे राहिले. तसेच बँकेकडून नोटिसा येऊ लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. याच मुद्दय़ावरून गेल्या काही महिन्यांपासून इमू व्यावसायिक आंदोलने करीत आहेत. यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती ठिय्या आंदोलन झाले होते. हा प्रश्न शिवसेनेने हाती घेत नाईक यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ठाणे लोकसभा मतदारसंघात नाईक यांचे पुत्र संजीव नाईक खासदार असून गेल्या काही दिवसांपासून मिळेल त्या मुद्दय़ावरून नाईक यांना लक्ष्य करण्याची रणनीती शिवसेनेने अवलंबिली आहे. विशेष म्हणजे, हा प्रश्न ज्या ग्रामीण भागातील आहे, तेथील व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांऐवजी ठाणे शहरातील तरुणांची फौज या आंदोलनात दिसून येत होती.
नाईकांच्या दरबारी शिवसेनेचा गोंधळ
लोकसभा निवडणुकांची चाहूल लागताच सर्वच पक्षांनी आंदोलनाचा धडाका लावला असून गुरुवारी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारात इमू व्यावसायिकांच्या प्रश्नावरून भारतीय विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
First published on: 14-02-2014 at 03:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh naik shiv sena