उत्पादनशुल्कमंत्री गणेश नाईक यांचे भाचे संतोष तांडेल हे अध्यक्ष असलेल्या बावखळेश्वर मंदिर ट्रस्टच्या खैरणे एमआयडीसी येथील कार्यालय व गेस्ट हाऊसला मंगळवारी एमआयडीसीच्या विशेष प्राधिकरणाने टाळे ठोकले. दोन आठवडय़ापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने या परिसरातील १ लाख ४५ हजार जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट केले होते. या ठिकाणी एमआयडीसीने मज्जाव करणारा फलक लावला असून अतिक्रमण करणाऱ्यांवर योग्य ती कारवाईचे संकेत दिले आहेत. या दोन्ही वास्तूवर कारवाई झाल्याने नाईक यांना मोठा धक्का मानला जात आहे.
वाशीतील समाजसेवक संदीप ठाकूर यांनी नवी मुंबई बेलापूर व खैरणे येथे पालकमंत्री गणेश नाईक यांचे भाचे संतोष तांडेल यांनी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने बेलापूर येथील ग्लास हाऊस व खैरणे एमआयडीसीतील बावखळेश्वर परिसरात अवैध बांधकाम झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्राधिकरणांना दिले होते. त्यानुसार एमआयडीसीचे विशेष नियोजन अधिकारी एस. यू. पंतगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. या परिसरातील तीन मंदिरांना मात्र या अधिकाऱ्यांनी कोणताही धक्का लावला नसला तरी या मंदिराकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या परिसरात आता प्रवेश निषिध्द मानला जाणार आहे. बेलापूर येथील ग्लास हाऊस (ग्रीन हाऊस) मधील बांधकाम काढण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु करण्यात आली असून नटबोल्टवर उभारलेले हे ग्लास हाऊस खाली उतरविले जात आहे.