भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे पदच्युत अध्यक्ष गणेश पांडे यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपावरून गुरुवारी पुन्हा एकदा विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर बोलताना गणेश पांडेला अजून अटक का झालेली नाही, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. फडणवीस यांनीही या प्रश्नाला लगेचच प्रत्युत्तर देत सरकार कोणालाही पाठिशी घालण्याचे कारणच नाही. तपास सुरू असून, पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे सभागृहात सांगितले.
या प्रकरणात कालच पीडित महिलेकडून वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सभागृहात हा विषय मांडताना जयंत पाटील म्हणाले, गणेश पांडेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण अद्याप त्यांना अटक झालेली नाही. पीडित महिला आणि पांडे हे दोघेही टेलिव्हिजनवर मुलाखती देताना मुख्यमंत्र्यांवर आपला विश्वास असल्याचे सांगताहेत. पीडित महिलेने याआधी लिहिलेले पत्रही गंभीर असून, त्यामध्ये मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचाही उल्लेख आहे. पण सराकरकडून अजून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे समाजात भयगंडाची भावना पसरली आहे. सरकारने काय कारवाई केली, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करून द्यावे, अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली.
त्यावर लगेचच उत्तर देताना फडणवीस म्हणाले, पीडित महिलेने आशिष शेलार यांना पत्र लिहिल्यावर त्यांनी संबंधित महिलेला पोलीस तक्रार करण्यास सांगितले होते. पण तिने सुरुवातीला पोलीस तक्रार करण्यास नकार दिला होता. तरीही सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्य महिला आयोगाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पीडित महिलेने काल पोलीस तक्रार केली आहे. पोलीस तपास करीत आहेत. सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही. दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा