सार्वजनिक बांधकाममंत्र्यांशी चर्चा करून गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल सवलत देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. महामार्गालगतचे दारूचे बार बंद करता येतील किंवा नाही, याबाबतही उत्पादन शुल्क विभागाशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या सवलतीचे नेमके स्वरूप काय असेल ते मात्र सार्वजनिक बांधकाममंत्र्यांशी चर्चा करून ठरवले जाणार आहे.
विधान परिषदेत डॉ. दीपक सावंत व इतर सदस्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ सातत्याने होणाऱ्या अपघातांबाबत मूळ प्रश्न विचारला होता. अपघात रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना, दारू पिऊन वाहने चालविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यासाठी मुंबईतून लाखोंच्या संख्येने गणेशभक्त कोकणात जातात. त्यावेळी महामार्गावर वाहनांची अधिक गर्दी होणार आहे. अशा वेळी काही दुर्घटना घडू नयेत, यासाठी वाहतूक नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्याबाबत सरकार काय करणार आहे, असा प्रश्न विरोधी पक्षनेते विनोद तावडे व अन्य सदस्यांनी विचारला. महामार्गालगतचे दारूचे बार बंद करावेत, अशी मागणीही काही सदस्यांनी केली. काही सदस्यांनी गणेशोत्सव काळात मुंबई-पुणे-कोल्हापूर या मार्गाने कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करावा, अशी मागणी केली. त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्र्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. तसेच कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी जास्तीत-जास्त पोलीस तैनात केले जातील. महामार्गालगतचे बार बंद करण्याबाबत उत्पादन शुल्क विभागाशी चर्चा करावी लागेल. बार बंद केले तर प्रवाशांच्या जेवणाची गैरसोय वगैरे होईल का, याचाही विचार करावा लागेल, असे गृहमंत्री म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा