लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाद्वारे विविध छायाचित्रांसह कौटुंबिक छायाचित्रे ‘घिबली’ (जपानी उच्चार जिबुरी) शैलीत रूपांतरित करण्यात येत आहे. ‘घिबली आर्ट’मधील छायाचित्रांनी समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातला असून अनेकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या कुतूहलापोटी अनेकजण गणपतीच्या छायाचित्रांचेही घिबली आर्टमध्ये रूपांतर करीत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचाही अंदाज चुकून व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता असते, त्यामुळे गणपती व इतर देव – देवतांच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ करू नका, असे आवाहन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने केले आहे.

विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व लक्षवेधी देखावे आणि मूर्तिकारांनी कल्पकतेने घडवलेल्या भव्य गणेशमूर्ती हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे जगप्रसिद्ध मुंबईचा गणेशोत्सव ‘घिबली आर्ट’मध्ये अनुभवण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. परिणामी, कुतूहल आणि उत्सुकतेपोटी अनेकजण मुंबईच्या गणेशोत्सवातील विविध छायाचित्रे आणि विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची छायाचित्रे ‘घिबली आर्ट’ शैलीत रूपांतरित करीत आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचाही अंदाज चुकून व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता असल्यामुळे गणपती व इतर देव – देवतांच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ शैलीत रूपांतर करू नका, असे आवाहन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने केले आहे.

दरम्यान, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने समाजमाध्यमांवर एक निवेदन प्रसिद्ध करीत आवाहन केले आहे की, ‘मुंबईच्या राजाच्या सर्व भक्तांना आदरपूर्वक आवाहन! आपणा सर्वांना ज्ञात आहे की, मुंबईचा राजा आणि इतर देवता आपल्या सर्वांच्या आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. देवतांच्या चित्रांमध्ये पवित्रता आणि पावित्र्य असते. सध्या समाजमाध्यमांवर काही लोक गणपतीच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ तयार करीत आहेत, जे योग्य वाटत नाही. सर्वांना नम्र विनंती आहे की, कृपया गणपतीच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ तयार करू नये किंवा ज्यांनी तयार केले असेल, त्यांनी ते समाजमाध्यमांवरून काढून टाकावे. अशा प्रकारच्या ‘एआय’ ॲपमध्ये व्यंग्यात्मक विडंबन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे नकळतपणे आपण आपल्याच देवाचा अपमान करतो. गणपतीच्या मूर्तीचे असे रूपांतर करणे योग्य नाही’.

आपल्या कलागुणांचा वापर करावा…

सर्वांनी आपल्या कलागुणांचा वापर करावा. ‘एआय’ ॲपचा वापर न करता आपल्या हातांनी किंवा डिजिटल सॉफ्टवेअरच्या मदतीने गणपतीची सुंदर चित्रे साकारून आपल्या कलेतून गणपतीवरील आपली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करावे. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असेही लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने निवेदनात म्हटले आहे.

काय आहे नेमके ‘घिबली’?

हयाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशियो सुझुकी यांनी १९८५ मध्ये स्थापन केलेला ‘स्टुडिओ घिबली’ हा एक जगप्रसिद्ध जपानी ॲनिमेशन स्टुडिओ आहे. या स्टुडिओच्या अनोख्या शैलीतील छायाचित्रे म्हणजे ‘घिबली आर्ट’. ज्यामध्ये पेस्टल आणि म्यूट कलर पॅलेट आणि गुंतागुंतीच्या तपशीलांचा वापर केलेला असतो. ही दृश्य शैली तिच्या सर्जनशील कलात्मक पद्धतीमुळे सर्वांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाद्वारे विविध छायाचित्रांसह कौटुंबिक छायाचित्रे ‘घिबली’ शैलीत रूपांतरित करण्याचा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे.