Mumbai Ganeshotsav 2024: यंदा गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय भाविकांना ‘क्यू आर कोड’द्वारे कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यू आर कोड’ श्री गणेश मूर्तिकारांच्या मंडपाबाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदी माध्यमांद्वारे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठकीचे मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्यासह मुंबई पोलीस दलाच्या प्रतिनिधी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी व पदाधिकारी, तसेच महानगरपालिकेचे विविध खात्यांचे व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा : वसतिगृह प्रवेश शुल्कात दुप्पट वाढ, मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थी नाराज

गणेशोत्सव ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी यंदाच्या उत्सवाबाबत माहिती दिली. यंदा गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदी माध्यमांशी संपर्क साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण करण्याची सुविधा पुरविण्याकरिता समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच गुगल मॅपमध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी भाविकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व कृत्रिम तलावांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. यंदा कृत्रिम तलावांची संख्या २०० पेक्षा अधिक वाढविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आल्याचेही सपकाळे यांनी बैठकीदरम्यान सांगितले. विसर्जनाच्या दिवशी स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), दादर चौपाटी, माहीम चौपाटी येथे भाविकांसाठी फिरत्या शौचालयांची संख्या वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.

हेही वाचा : अभियांत्रिकीची पहिली प्रवेश यादी १४ ऑगस्टला

एक खिडकी योजना सुरू

गेली दहा वर्षे शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील दहा वर्षात सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे व त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे स्वयंघोषणापत्र आवश्यक असणार आहे. या परवानगीचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असेल. मंगळवारी ६ ऑगस्टपासून एक खिडकी योजनेनुसार संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav 2024 list of artificial lakes on google map mumbai print news css