मुंबई : यंदा शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या वरळी नाक्यावरील आचार्य अत्रे चौकाजवळील श्री गणेश सेवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आजही हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांतील ऐक्याचे दर्शन घडत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार मंडळाच्या आगमन मिरवणुकीत गणेशमूर्तीचा रथ ओढण्याचा मान यंदाही मुस्लीम बांधवांना देण्यात आला होता.
साधारण १०० वर्षांपूर्वी वरळी परिसरात दाट लोकवस्ती होती. व्यापारी केंद्र अशीही या परिसराची ओळख होती. या परिसरात सामाजिक आणि धार्मिक सलोखा राखला जावा या उद्देशाने सर्वधर्मीय बांधवांनी एकत्र येऊन विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील सर्वधर्मीय आणि व्यापारी मंडळींनी १९२२ मध्ये श्री गणेश सेवा मंडळाची स्थापना केली. सामाजिक आणि धार्मिक एकात्मता लक्षात घेऊन तेव्हापासून मंडळाच्या आगमन मिरवणुकीत गणेशमूर्तीची पालखी उचलण्याचा मान मुस्लीम बांधवांना देण्यात आला होता. कालौघात गणेशमूर्तीची उंची वाढविण्यात आली आणि त्यानंतर रथावरून गणेशाचे आगमन होऊ लागले आणि रथ खेचण्याचा मान मुस्लीम बांधवांकडेच कायम राहिला.
हेही वाचा >>>गणेशोत्सवात ‘एसटी’च्या गट आरक्षणातून राजकीय पक्षांचे मतांचे गणित
श्री गणेश सेवा मंडळाची गणेशमूर्ती रविवारी ढोल-ताश्याच्या गजरात मंडपस्थळी मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीय मंडळी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यंदा शतकपूर्ती असल्याकारणाने मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पेणमधील गणेशमूर्ती व्यवसायाचा समूह विकास रखडला
वरळी परिसरात ब्रिटिशकालीन अंजूमन आशिकाने रसूल मशीद असून या मशिदीत पूर्वीपासून मुस्लिमांसोबत हिंदू बांधवांचे येणे-जाणे आहे. येथे साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणात हिंदू बांधव आनंदाने सहभागी होत असतात. तसेच हिंदूंच्या सणांमध्ये मुस्लीम बांधव सहभागी होतात. गणेशोत्सव हा सर्वाचाच उत्सव आहे. त्याच भावनेने गेल्या अनेक वर्षांपासून आम्हीही त्यात सहभागी होतो. मुंबईमध्ये १९९२-९३ मध्ये दंगल उसळली होती. त्या वेळी या परिसरातील हिंदू बांधवांनी मुस्लीम समाजाला मदतीचा हात दिला होता.
– इम्तियाज शेख, अध्यक्ष, अंजूमन आशिकाने रसूल मशीद