वर्सोवा येथे रिक्षाचालकावर चाकूने हल्ला करून त्याला लुटणाऱ्या टोळीला १२ तासांमध्ये अटक करणाऱ्या पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी अशा प्रकार आणखी गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. आरोपींविरोधात चोरी व हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालकाची चोरलेली रोख रक्कम व मोबाइल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>> Medha Somaiya Defamation Case : संजय राऊत यांना न्यायालयाचा अंशत: दिलासा, 30 दिवसांसाठी….
तक्रादार रिक्षाचालक असून मंगळवारी रात्री १ च्या सुमारास वर्सोवा जे. पी. रोड येथील चाय-कॉफी बस थांब्याजवळ ते मोबाइलवर बोलत होते. त्यावेळी चार तरूण दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून तक्रारदारांच्या खिशातील रोख १५ हजार रोख व मोबाइल हिसकावून घेतला. रिक्षाचालकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात रिक्षाचालक जखमी झाले. त्यांतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी रिक्षा चालकाने वर्सोवा पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तीन पोलीस पथके तयार केली. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने तपास केला असता पोलिसांना गुन्ह्यांत वापरलेल्या मोटरसायकलचा क्रमांक मिळाला. त्यावर आरोपी मेघवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुनीत अनिलकुमार तिवारी (२०), विकास ईश्वर खारवा (२३) व राहुल अशोक राणा (२३) यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा >>> पत्राचाळीत म्हाडाची ७२ दुकाने; ई-लिलावाद्वारे विक्री होणाऱ्या दुकानांच्या बांधकामाला सुरुवात
सुनील व विकास हे दोघेही जोगेश्वरी पूर्व येथील हरीनगरमधील रहिवासी आहेत. तर राणा हा अंधेरी पूर्व येथील महाकाली रोड परिसरातील रहिवासी आहे. चौकशीत गुन्ह्यांतील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालाया पुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार, दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. तसेच तक्रारदारांचा मोबाइल व रोख रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपींच्या एका साथीदाराची माहिती मिळाली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी यापूर्वीही काही गुन्हे केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.