मुंबई : शेअर्स खरेदी – विक्रीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. ऋषक शिरोडकर (३८), कृष्णा गवळी (२४) आणि सोहेल शेख उर्फ जॅक (३०) अशी आरोपींची नावे असून याप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय तक्रारदारांना आरोपींनी १७ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान व्हाॅट्स ॲपवरील एका समुहात सामील केले. त्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. ब्लॉक ट्रेडींग, क्युआयपी आणि आयपीओमध्ये गुंतणूक करण्याच्या बहाण्याने ७७ लाख ४२ हजार ६५१ रुपये घेतले. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास सुरू केला.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या बँक खात्यात फसवणुकीचे ७१ लाख रुपये जमा झाले होते. त्याद्वारे पोलिसांनी आरोपी शिरोडकर, गवळी आणि शेख यांना अटक केली. आरोपींकडून चार मोबाइल फोन, डेबिट कार्ड, धनादेश जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शिरोडकरने स्वतः आयडीएफसी फर्स्ट बँकेत चालू खाते उघडले होते. यात गुन्ह्यातील रक्कम जमा होत होती. आरोपी गवळीने शिरोडकर याच्या बँक खाते, नेट बॅंकिंगची माहिती, मोबाइल सिमकार्ड घेऊन ते आरोपी शेख याला दिले होते. शिरोडकरच्या खात्याविरोधात देशभरात २८ तक्रारी असून या खात्यातून १८ कोटींच्या फसवणुकीच्या रकमेचा व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.