लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः एटीएममध्ये बोलण्यात गुंतवून हातचालाखीने ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे काढणाऱ्या चौघांना कुरार पोलिसांनी अटक केली. आरोपींविरोधात कुरारसह अन्य पाच पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. चौकशीत आरोपींच्या आणखी एका साथीदाराची माहिती मिळाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गोरेगाव येथे वास्तव्यास असलेल्या लिला डोमनिक जेवियर (५७) १६ मे रोजी एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. एटीएम यंत्रात कार्ड अडकत असल्याची बतावणी एक व्यक्ती करीत होता. त्याने लिला यांनाही पैसे काढून पाहण्याची विनंती केली. त्यावेळी लिला यांनी एटीएम यंत्रातून पैसे काढण्याची प्रक्रिया केली. मात्र त्याच वेळी त्या व्यक्तीने व्यवहार होत असल्याचे सांगताच लिला एटीएम केंद्रातून बाहेर पडले. त्यानंतर पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि लिला यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले गेले. मात्र लिला यांना हा प्रकार समजलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लिला यांच्या लक्षात आले आणि त्यांनी याप्रकरणी कुरार पोलिसांकडे तक्रार केली.
आणखी वाचा-मुंबई: बंडखोरांच्या निषेधात वरळी शांत, पदाधिकाऱ्यांची झाडाझडती सुरू
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गाढवे, पोलीस निरीक्षक मनोज चाळके (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वानखेडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासले. चित्रीकरणाच्या तपासणीअंती मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटली. आरोपी राहत असलेल्या परिसरात पोलीस पोहोचले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून पोलिसांनी भांडूप पश्चिम येथील गावदेवी मंदिराजवळ सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता आणखी एका आरोपीचे नाव उघड झाले. पोलिसांनी त्यालाही अटक केली. आरोपींच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
धर्मवीर किशुन महतो(३२), विवेक कुमार बुधन पासवान(२८), बिरलाल लक्ष्मण सहा(२३) व किशोर कांचन महतो(२७) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात माटुगा, पार्कसाईट, वरळी, भायखळा व वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फसवणूकीची गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी आणखी ठिकाणीही अशा प्रकारे फसवणूक केल्याचा संशय असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.