लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : चुनाभट्टी परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम करणाऱ्या पालिकेच्या कंत्राटदाराकडून खंडणी उकळणाऱ्या चौघांना शुक्रवारी चुनाभट्टी पोलिसांनी दोन तासात अटक केली. गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेचा कंत्राटदार चुनाभट्टी परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम करीत आहे. या परिसरातील एका टोळीने पालिका कंत्राटदाराकडे अनेकदा खंडणी मागितली होती. मात्र त्याने खंडणी देण्यास नकार दिला होता.
आणखी वाचा-पत्नीला ‘सेकंड हॅण्ड’ म्हटल्याने न्यायालयाने पतीला ठोठावला तीन कोटींचा दंड
कंत्राटदार शुक्रवारी परिसरात काम करीत असताना आरोपींनी त्याला अडवले आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. याबाबत कंत्राटदाराने चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आकाश खंडागळे (३१), उमेश पल्ले (४०), राकेश राणे (४५) आणि ऋषीकेश भोवाळ (२२) या चौघांना अटक केली. अटक आरोपींपैकी दोघे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.