मुंबई : चाकूचा धाक दाखवून ओला-उबर चालकांना लुटणाऱ्या एका टोळीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी शहरात अनेकांना लुटल्याचा पोलिसांना संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा : अपंगांना बेस्टचे स्मार्ट कार्ड घरपोच मिळणार
असिफ शेख (२२), समसुद्दीन अन्सारी (२३), मोईन कादरी (२२) आणि तारीख खान (२३) अशी या आरोपींची नावे असून सर्वजण गोवंडी-शिवाजी नगर येथील रहिवासी आहेत. शहरातील विविध भागातून गोवंडीत येण्यासाठी आरोपी ओला-उबर टॅक्सी आरक्षित करीत होते. मात्र गोवंडीत पोहोचल्यानंतर टॅक्सीचालकाला निर्जन ठिकाणी नेऊन लुटण्यात येत होते. आरोपींनी १२ ऑगस्ट रोजी अजीज अन्सारी (३८) या टॅक्सीचालकाची टॅक्सी आरक्षित केली. त्यानंतर त्याला गोवंडी-शिवाजी नगर येथील टपाल कार्यालयाजवळ आणण्यात आले. तेथे चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाइल आणि काही रोख रक्कम घेऊन आरोपींनी पोबारा केला.
अजीजने याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी काही सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण ताब्यात घेतले. एका सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणावरून पोलिसांना आरोपींची ओळख पटली. त्यानंतर या टोळीला याच परिसरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.