भांडुप येथील कुख्यात गुंड संतोष चव्हाण उर्फ काण्या (३८) याची सोमवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भांडुप येथील साई हिल रोडवर ही घटना घडली. हल्लेखोरांनी गावठी बंदुकीतून संतोषवर एकूण सहा गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात संतोषचा एक साथीदार जखमी झाला आहे.
संतोष चव्हाण भांडुपमधील समर्थ नगरमध्ये राहात होता. भांडुप पश्चिमेच्या साई हिल रोड वरील सुभेदार भैय्या चाळीत तो पत्ते खेळायला यायचा. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास याच परिसरात राहणारे अमित भोगले, आदित्य क्षीरसागर, मिलींद कांदे आणि राकेश राऊत उर्फ राव हे चौघे गुंड तेथे आले. त्यांनी गावठी कट्टय़ातून संतोषवर जवळून सहा गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या संतोषच्या छातीत तर एक गोळी डोक्यात लागली. या हल्ल्यात संतोषसह त्याचा साथीदार जमाल हा देखील जखमी झाला. जखमी अवस्थेतील संतोषला भांडुपच्या फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.
संतोष चव्हाण हा कुख्यात गुंड असून नुकतीच त्याच्यावर एमपीडीएअन्वये कारवाई करण्यात आली होती. त्याच्या नावावर १० ते १२ गुन्ह्यांची नोंद आहे. तर हल्लेखोर अमित भोगले हा सुद्धा सराईत गुंड असून त्याच्याही नावावर १० ते १२ गुन्ह्याची नोंद असल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे खंडणीच्या एका प्रकरणी मंगळवारी अमित भोगले हा न्यायालयात हजर राहणार होता.
व्यावसायिक वादातून हत्या?
संतोष चव्हाण आणि हल्लेखोर दोघेही पूर्वी कुमार पिल्ले टोळीसाठी काम करीत असत. कालांतराने ते वेगळे झाले आणि त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या कारवाया सुरू केल्या. संतोष चव्हाण एका राजकीय पक्षाच्या संघटनेच्या आश्रयाला गेला तर अमित भोगले एका राजकीय नेत्याचे पाठबळ मिळवून काम करत होता. एक भूखंड विकसित करण्याचे काम संतोष चव्हाणला मिळाले होते. त्यावरूनही त्यांच्यात वाद सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी दिली. प्रतिस्पध्र्याचा अशा पद्धतीने हत्या केल्याने मुंबईत पुन्हा गँगवार सुरू झाल्याचे बोलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा