कामाठीपुराच्या उल्लेखाविरोधातील याचिका फेटाळल्या
मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडीह्ण या चित्रपटातील कामाठीपुराच्या उल्लेखामुळे संपूर्ण परिसराची विशेषत: येथील महिलांची बदनामी होत आहे. त्यामुळे चित्रपटातून ‘कामाठीपुरा’ हा उल्लेख वगळण्याची मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळल्या. त्यामुळे कोणतेही दृश्य न वगळता चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांच्यासह या परिसरातील रहिवासी श्रद्धा सुर्वे यांनी या प्रकरणी याचिका केली होती. तसेच चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर बुधवारी प्रदीर्घ सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळून त्याबाबतचा तपशीलवार आदेश नंतर देण्याचे स्पष्ट केले.
चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे या चित्रपटातील ‘कामाठीपुरा’ या उल्लेखामुळे हा परिसर केवळ वेश्याव्यवसायासाठी ओळखला जात असल्याचे आणि या भागातील सर्व मुली वेश्याव्यवसायात आहेत असा गैरसमज परसण्याची शक्यता असल्याचा दावा याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला. तर चित्रपटाची झलक पाहून निष्कर्षांपर्यंत पोहोचवण्याऐवजी चित्रपट पूर्ण पाहायला हवा. शिवाय या चित्रपटात ज्या कालखंडाचे चित्रण करण्यात आले आहे त्याचाही विचार व्हायला हवा, असा युक्तिवाद निर्मात्यांतर्फे केला. तसेच या प्रकरणी नाराजीची चुकीची भावना असल्याचा दावा करत चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली.