समीर कर्णुक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्त्यांवरील कचरापेटीमुळे होणारी दुर्गंधी टाळण्यासाठी पालिकेने शहरात अनेक ठिकाणी भूमिगत कचरा पेटी बसवल्या आहेत. चेंबूर परिसरात देखील वर्षभरापूर्वी कचरापेट्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र योग्य देखभाली अभावी या कचरापेट्याच कचऱ्यात जमा झाल्या असून यामुळे मुंबईकरांचे लाखो रुपये पालिकेने पाण्यात घालवल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

मुंबई शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर पालिकेने उघड्या कचरा पेट्या बसवल्या आहेत. मात्र, या पेट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य असते. शिवाय अनेक ठिकाणी मोकाट जनावरे हा कचरा रस्त्यावर उडवतात. परिणामी रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर तोडगा म्हणून पालिकेने मुंबईतील काही ठिकाणी भूमिगत कचरा पेट्या बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येकी दहा लाख रुपये खर्च करून पालिकेने मुंबईत अनेक ठिकाणी भूमिगत कचरा पेट्या तयार केल्या. मात्र, अनेक ठिकाणी या कचरा पेट्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक कचरा न टाकता बाहेरच टाकत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा परिसरात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

चेंबूरच्या एम पश्चिम विभागातील सांडूवाडी परिसरातही कचरा पेटी बसवण्यात आली होती. मात्र काही महिन्यातच या कचरापेटीची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सर्व सामन्यांचे लाखो रुपये पालिकेने वाया घालवल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पालिकेने तत्काळ याची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जागरूक नागरिक कृती समितीचे अध्यक्ष कैलास अरवडे यांनी केली आहे.

दरम्यान सांडूवाडी येथील कचरा पेटी सूस्थितीत आहे. मात्र काही नागरिक पेटीबाहेर कचरा फेकत असून त्यामुळे घाण होत असल्याची माहिती एम पश्चिम विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage boxes accumulate in the garbage within a year mumbai print news amy