मुंबई: मुंबईकरांवर कचरा संकलन व वापरकर्ता शुल्क लावण्याकरीता मुंबई महापालिकेने नवीन नियमावली तयारी केली आहे. मुंबईकरांकडून कचरा संकलन व वापरकर्ता शुल्क हे मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केले जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य उपविधीमध्ये सुधारणा करण्यात याली असून हा नव्या नियमावलीचा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ३१ मे पर्यंत नागरिकांना त्यावर सूचना व हरकती नोंदवता येणार आहे.

मुंबईकरांवर कचरा शुल्क लावण्याचे सुतोवाच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आगामी अर्थसंकल्पात केले होते. हे कचरा शुल्क लावण्याकरीता मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी २००६ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीचा मसुदा १ एप्रिल रोजी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ हे सध्या लागू आहेत. या उपविधीमध्ये कालसुसंगत तसेच विविध शासकीय, प्रशासकीय बदलानुसार योग्य तो आढावा घेऊन नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे.

सगळ्याच बाबतीत भलामोठा व्याप असलेल्या मुंबई शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही अवाढव्य आहे. एका शहराचा संपूर्ण अर्थसंकल्प जितका असतो तितका निधी केवळ घनकचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिका करत असते. दरदिवशी निर्माण होणाऱ्या तब्बल सहा हजार मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे शिवधनुष्य मुंबई महानगरपालिका उचलत असते. येत्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढणार आहे. घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्कातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा वापर घनकचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये सुधारणा अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याकरिता वापरण्यात येणार आहे.

देशातील बहुतांशी शहरांमध्ये नागरिकांकडून कचरा शुल्क वसूल केले जाते. मात्र मुंबई महापालिका असे कोणतेही शुल्क मुंबईकरांकडून घेत नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानामध्ये मुंबईला क्रमांक मिळत नाही. त्यामुळे कचरा संकलन कर लावण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा कर लावण्याबाबत पालिका प्रशासनाच्या स्तरावर गेल्या काही महिन्यांपासून विचार विनिमय सुरू होता. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे याबाबत सादरीकरणही करण्यात आले होते. पालिकेने सध्या महसूल वाढीसाठी शक्यतेवढ्या सर्व उपयोजना, शुल्क लावणे असे उपाय केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कचरा शुल्क लावले जाणार आहे.

तसेच रस्त्यावर कचरा करणाऱ्यांकडून जो दंड वसूल केला जातो त्यातही सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कचरा टाकल्यास, रस्त्यावर थुकल्यास आतापर्यंत जे दंड वसूल केले जात होते त्यातही वाढ करण्यात आली आहे. रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे, तर थुंकणाऱ्यांकडून आता २५० रुपये वसूल केले जाणार आहे. हे दंड वसूल करण्यासाठी पालिका नव्याने क्लीन अप मार्शलची नेमणूक करणार आहे.

वापरकर्ता शुल्क १०० रुपये ते साडेसात हजार रुपये

निवासी इमारतींसह हॉटेल, सभागृह, लग्नाचे हॉल, दवाखाने, वसतिगृहे अशा सगळ्याच आस्थापनांना हे शुल्क लावले जाणार आहे. वापरकर्ता शुल्क हे किमान १०० रुपये ते साडेसात हजार रुपयांपर्यंत वसूल केले जाणार आहे. ५० चौरस मीटरपर्यंतच्या घरांसाठी १०० रुपये, त्यापेक्षा मोठ्या व ३०० चौरस मीटरपर्यंतच्या घरासाठी ५०० रुपये, ३०० चौरस मीटरपेक्षा मोठ्या घरांसाठी एक हजार रुपये तर ३००० चौरस मीटरपेक्षा मोठे सभागृह, विवाह सभागृह यांना साडे सात हजार रुपये कचरा वापरकर्ता शुल्क लावण्यात येणार आहे. महापालिकेला वार्षिक पाचशे ते सहाशे कोटींचे उत्पन्न मिळू शकेल असा पालिका प्रशासनाला विश्वास आहे.

कुठे पाहाल नवीन नियमावलीचा मसुदा ….

बृहन्मुंबई महानगरपालिका स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २०२५ या शीर्षकाखालील या मसुदा उपविधीची प्रत बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in >;>; नवीन) उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व धोरणनिर्माते, हितधारक, भागधारक आणि नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २०२५ चा आढावा घ्यावा. या मसुदा उपविधीबाबत आपल्या सूचना व हरकती दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी ई-मेलद्वारे bmc.swmbyelaws2025@gmail.com यावर पाठवता येतील.

येथे सूचना व हरकती नोंदवाव्या ….

bmc.swmbyelaws2025@gmail.com या ईमेलवर किंवा घनकचरा व्यवस्थापन मुख्य कार्यालयात लेखी सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ज्यांना लेखी स्वरूपात सूचना अथवा हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (शासकीय व सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता) सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत – प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांचे कार्यालय, तिसरा मजला, महानगरपालिका खटाव मंडई इमारत, अविष्कार इमारतीसमोर, स्लेटर रोड, ग्रँट रोड (पश्चिम), मुंबई-४००००७ या कार्यालयीन पत्त्यावर सूचना / हरकती पाठवाव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी आवाहन केले आहे.