मुंबईच्या किनाऱ्यावरील कचऱ्यामुळे खेकडे, शोभिवंत मासे, स्टार फिश यांचे अस्तित्व धोक्यात
वाढते शहरीकरण एकीकडे मुंबईच्या किनाऱ्याचा समुद्र आणखी आत लोटत असतानाच या किनाऱ्यांवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या लाटा किनाऱ्याजवळ तग धरून असलेल्या सागरी प्रजातींच्या जिवावर उठल्या आहेत. दक्षिण मुंबईतील कफ परेड ते गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे येथे अधिवास करून राहिलेल्या सी-हॉर्स व पाइप फिश आणि स्टार फिश, जिवंत प्रवाळ, लॉबस्टर, खेकडे, शोभिवंत मासे अशा सागरी प्रजाती हळूहळू नष्ट होऊ लागल्या आहेत. कचऱ्याचे प्रमाण कायम राहिल्यास येत्या पाच वर्षांत या सागरी प्रजाती नामशेष होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
मुंबईला कफ परेडपासून उत्तनपर्यंत असा अंदाजे ७० किलोमीटर लांबवपर्यंत पसरलेला किनारा लाभलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून किनाऱ्यांजवळ भराव टाकून बांधकामे करण्यात आल्याने समुद्राची हद्द कमी होत चालली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही सागरी प्रजातींनी किनाऱ्याजवळचे आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कफ परेडपासून गिरगाव चौपाटीपर्यंतच्या समुद्रकिनारपट्टीच्या भागात सी-हॉर्स व पाइप फिश आणि स्टार फिश, जिवंत प्रवाळ, लॉबस्टर, खेकडे, शोभिवंत मासे आढळतात. मात्र या किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचू लागल्याने या प्रजाती संकटात सापडल्या आहेत.
‘रिफ वॉच मरिन कन्झर्वेशन फाऊंडेशन’ या मुंबईतील संस्थेने नोव्हेंबर २०१५ ते मे २०१६ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात किनाऱ्यांवर प्लास्टिक, रबरी वस्तू, कोळ्यांची जाळी, गाडय़ांचे टायर, कपडे, पुठ्ठे, थर्मोकॉल, निर्माल्य, कागद, तेल, रसायने असा कचरा आढळून आला. कफ परेड, बधवार पार्क तसेच जुहू, वर्सोवा, अक्सा, चिंबाई, एरंगळ, मढ, दादर येथील चौपाटय़ांवर कोणत्याही क्षणी गेल्यास १० ते ३० हजार किलोंदरम्यान कचरा आढळून आला. याचा थेट परिणाम येथील सागरी जिवांवर होत असून आगामी काळात या प्रजाती मुंबईतून लोप पावतील, असे सागरी परिसंस्थेचे अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यात समुद्र ढवळला जातो आणि तळावर बसलेला कचरा हा किनाऱ्यावर येतो, तेव्हा हा कचरा पालिकेने तात्काळ उचलला पाहिजे असेही ते म्हणाले.
कुठून येतो कचरा?
- किनाऱ्यांवर पर्यटक सोबत आणलेल्या वस्तू किनाऱ्यांवरच सोडून देतात. किनारपट्टीलगत कोळीवाडे व झोपडपट्टय़ा असून त्यांच्यामार्फत कचरा थेट समुद्रात टाकण्यात येतो.
- पालिकेच्या वाहिन्यांमधून सांडपाणी व काही नाल्यांमार्फत कचरा थेट सागरात प्रवेश करतो. तर काही उद्योगांची रसायने विना प्रक्रिया थेट समुद्रात सोडली गेल्यानेही पाणी प्रदूषित होत आहे.
प्रत्येक चौपाटीवरचा कचरा उचलण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराची नेमणूक केली आहे. कचरा आढळल्यास हे ठेकेदार कचरा उचलतात. मात्र पावसाळ्यात नाल्यांमधून कचरा वाहून येतो व चौपाटीवर साठतो. हा कचरा हटवण्याचे वेळोवेळी संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.
– विजय बालमवार, पालिकेच्या घन-कचरा विभागाचे उपायुक्त