मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील हजारो सफाई कामगार – कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात कचरा वेळेवर उचलण्यात दिरंगाई होत असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मोठ्या संख्येने सफाई कामगार निवडणुकीच्या कामात व्यस्त असून स्वच्छतेच्या कामांसाठी कामगारांची संख्या अपुरी पडत आहे. स्वच्छतेत होणारी दिरंगाई टाळण्यासाठी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेले आणि संबंधित पदावरील काम पूर्ण झालेले कामगार पुन्हा कामावर परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांतील अनेक भागांत कचऱ्यासंदर्भातील समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. कचरा वेळेवर उचलण्यात येत नाही. परिणामी अनेक ठिकणी कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरून नागरिक त्रस्त होत आहेत. डोंगरी, नळबाजार, वडाळा, धारावी, मानखुर्द – गोवंडी, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, माहीम, अंधेरी, गोरेगाव आदी भागातून कचऱ्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. तसेच, संबंधित तक्रारींकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक, लेखक समीर विद्वांस यांनीही मागील आठवड्यात फिल्मसिटी मार्गावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसिद्ध करून प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी निवडणुकीच्या कामात अनेक कामगार व्यस्त असल्याने सफाईच्या कामात दिरंगाई होत असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले होते.
हेही वाचा >>>मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात तिरंगी लढत; मुस्लिम मते ठरणार निर्णायक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील २१ हजार कामगार – कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ८ हजार कामगारांची निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कामासाठी २० हजार ८१० कामगारांपैकी ४६८८ कामगारांची , तर ३५२९ कर्मचाऱ्यांची शिपाई पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, घनकचरा व्यवस्थापन विभागातील ३२१ कनिष्ठ अनुवेक्षकांपैकी १०२ जणांची क्षेत्रीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी, हजारो कामगार निवडणुकीच्या कामात असल्यामुळे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली आहे.
मतदारांना मतदाना केंद्राविषयी माहिती देणारी पावती मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम बूथस्तरीय अधिकारी करतात. मात्र, ही कामे जवळपास पूर्ण झाली असल्यामुळे येथीलसफाई कामगार पुन्हा मूळ कामावर परतल्यास हरकत नाही. अस्वच्छतेची समस्या सोडविण्यासाठी, तसेच स्वच्छताविषयक कामात होत असलेल्या दिरंगाईचा प्रश्न सोडविण्यासाठी कामगारांना निवडणूक कामातून मुक्त करण्याबाबत वरिष्ठांकडे विचारणा करण्यात येईल, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.