ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने २४० लिटर क्षमतेच्या तब्बल १५ हजार बंदीस्त कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यांच्या विभागात या कचराकुंडय़ा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कचराकुंडय़ा नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकण्याचे प्रकार मुंबईत वाढू लागले आहेत. त्यामुळे कचराकुंडय़ा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून स्थानिक नगरसेवकांकडे करण्यात येत आहे. त्यामुळे नगरसेवक निधीमधून कचराकुंडय़ा घेण्यास परवानगी देण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. आता ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तब्बल १५ हजार कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘डम्पोबिन भारत’ बनावटीच्या २४० लिटर क्षमतेच्या बंद कचराकुंडय़ा मे. टाईम टेक्नोप्लास्ट कंपनीकडून खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एका कचराकुंडीसाठी पालिकेला २,५८५ रुपये खर्च येणार आहे.
एकूण ३ कोटी ८७ लाख ७५ हजार रुपये खर्च करून पालिका १५ हजार कचराकुंडय़ा खरेदी करणार आहे. यापैकी १०,५०० कचराकुंडय़ा नगरसेवकांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहेत. तर उर्वरित कचराकुंडय़ा घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांना मिळणार आहेत.
ज्यादा पैसे मोजावे लागणार
यापूर्वीही महापालिकेने २ कोटी ३६ लाख रुपये खर्च करून १५ हजार कचराकुंडय़ा खरेदी केल्या होत्या. मात्र पुरवठादाराबरोबरचा करार २१ जुलै २०१४ रोजी संपुष्टात आल्यामुळे पालिकेने कचराकुंडय़ा खरेदीसाठी निविदा मागविल्या होत्या. पूर्वी महापालिकेने प्रती नग २,२४१ रुपये दराने कचराकुंडय़ा घेतल्या होत्या. मात्र आता प्रतीनग २४४ रुपये जादा मोजून पालिकेला या कचराकुंडय़ा घ्याव्या लागणार आहेत.

Story img Loader