मुंबई : मुंबई महापालिकेने पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी अन्य सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र गेल्या चार वर्षांपासून वन विभाग आणि वन्यजीव विभागाची परवानगी मिळू न शकल्याने हा प्रकल्प रखडला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यास परवानगीची प्रक्रिया आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याची मागणी आणि पुरवठा यातील तूट भरून काढणे कठीण होणार आहे.
गारगाई धरणासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे कापावी लागणार असल्यामुळे हा प्रकल्प पालिका प्रशासनाने बाजूला ठेवला होता. मात्र मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या १० वर्षांत एकही नवीन धरण मुंबई पालिकेने बांधलेले नाही. त्यातच समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही रखडला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे तानसा अभयारण्य बाधित होणार असून त्याकरिता वन्यजीव विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच वन विभागाचीही परवानगी आवश्यक आहे. या परवानग्यांसाठी २०२० मध्ये अर्ज करण्यात आला असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
हे ही वाचा…ग्रॅन्ट रोड येथे इमारतीचे छत कोसळले, मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता
३,९५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा
सात धरणांमधून मुंबईला दर दिवशी ३,९५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पाण्याची गरज लक्षात पालिकेने गारगाई, पिंजाळ, दमणगंगा हे तीन प्रकल्प हाती घेतले. मात्र, यांचे काम रखडले आहे.
गरगाई धरण बांधल्यानंतर ४४० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. २०४१ पर्यंत मुंबईकरांना ५,९४० दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासणार आहे.