मुंबई : मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्याकरिता येत्या काळात गारगाई धरण प्रकल्पाला वेग मिळणार आहे. गारगाई धरण प्रकल्पाला वेग देण्यासाठी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली होती. या प्रकल्पासाठी वन विभाग आणि वन्यजीव मंडळाची परवानगी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतल्यामुळे या परवानग्यांच्या प्रक्रियेला वेग येणार असला, तरी परवानगी मिळून धरणाचे बांधकाम होऊन पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत किमान पाच ते सहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबईला पाणी पुरवठ्यासाठी सध्या तरी सात धरणातील पाणीसाठ्यावर भिस्त आहे.
सगळी धरणे कठोकाठ भरली तरी गेली सलग तीन वर्षे मुंबईकरांवर पावसाळ्याच्या आधी पाणी कपात लागू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेने गारगाई धरण प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे. मात्र गारगाई धरण प्रकल्पामुळे तानसा अभयारण्य बाधित होणार असून त्याकरिता वन्यजीव विभागाची परवानगी लागणार आहे. तसेच वन विभागाचीही परवानगी लागणार आहे. या परवानग्यासाठी मुंबई महापालिकेने २०२० मध्ये अर्ज सादर केले आहेत. मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. परवानगी मिळण्यास किमान सहा महिने लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर किमान चार वर्षे प्रत्यक्ष बांधकाम अशी पुढची किमान पाच सहा वर्षे धरण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या प्रकल्पामुळे अभयारण्य बाधित होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. या प्रकल्पामुळे अंशत: बाधित होणारी चार गावे देखील अभयारण्यातून बाहेर काढली जाणार आहेत. तसेच राज्य महामार्गही अभयारण्यातून स्थलांतरित केला जाणार आहे. त्यामुळे अभयारण्यातील मनुष्य वावर कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे अभयारण्याचा, वन विभागाचा फायदाच होणार आहे अशा रितीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच ज्या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन, जमीनीचे पैसे, तसेच कुटुंबातील एकाला नोकरी असा चांगला मोबदला दिला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
प्रकल्पाविषयी …
१) सन २०१९ च्या अंदाजानुसार या प्रकल्पासाठी ३१०० कोटींचा खर्च अपेक्षित असून परवानग्या रखडल्यामुळे हा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.
२) गारगाई धरण प्रकल्प वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ बांधण्यात येणार आहे. हे धरण बांधून पूर्ण झाल्यास त्यातून रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला मिळणार आहे.
३) धरणामुळे बाधित होणाऱ्या सहा गावांचे देवळी गावात स्थलांतर करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ओगदे, खोडदे ही गावे पूर्णत: बाधित होणार असून तिळमाळ, पाचघर,
फणसगाव, आमले ही गावे अंशत: बाधित होणार आहेत. गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. गारगाई धरणासाठी ४२६ हेक्टर खाजगी जमीन पालिकेला खरेदी करावी लागणार आहे.
४) या प्रकल्पामुळे सुमारे ६१९ कुटुंबे बाधित होणार आहेत.
५) भूसंपादन व पुनर्वसनाचा खर्च मिळून पालिकेला २५७ कोटींचा खर्च येणार आहे.
५) वनविभागालाही जमिनीचा मोबदला द्यावा लागणार आहे.