सोनारपाडा भागातील एका कंपनीत बुधवारी रात्री अचानक वायुगळती झाल्याने नागरिकांना डोळे चुरचुरणे, उलटय़ा होणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे प्रकार घडले. सोनारपाडा ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने गुरुवारी याबाबतची लेखी तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना देऊन दोषी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.
स्थानिक रहिवाशांना रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक विषारी वायूचा त्रास  होऊ लागला. खबरदारी म्हणून रहिवाशांनी घराचे दरवाजे, खिडक्या बंद केल्या. तरीही त्रास कमी झाला नाही.  तात्काळ मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित कंपनीची पाहणी केली. या प्रकरणी दोषींविरुद्ध पोलीस कारवाई करतील असे नागरिकांना वाटत होते; परंतु गुरुवारी संध्याकाळपर्यंत पोलिसांनी संबंधित व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला नव्हता. ओरड झाल्यानंतर विषारी वायूचा वास पहाटेपर्यंत कमी झाला, असे रहिवाशांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून एमआयडीसी परिसरातील रहिवासी प्रदूषणामुळे हैराण आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा डोळेझाकपणा, पोलिसांचे दुर्लक्ष आणि काही कंपन्यांशी असलेल्या या मंडळींचे साटेलोटे त्यामुळे प्रदूषणाचा त्रास कमी होत नाही, असे गणेश म्हात्रे, राजू नलावडे यांनी सांगितले.

Story img Loader