मुंबई : अंधेरी येथील तक्षशिला परिसरातील गुरुद्वारानजीकच्या रस्त्यावर शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गॅसवाहिनी फुटल्याने भीषण आग लागली. या आगीत दोन दुचाकीस्वार आणि एक रिक्षाचालक होरपळल्याने जखमी झाले असून सद्यस्थितीत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आगीत दोन वाहने जळून खाक झाली असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

अंधेरीतील शेर ए पंजाब हॉटेलजवळील रस्त्याखालील एमजीएल आणि पीएनजी वायूचा पुरवठा करणाऱ्या गॅस वाहिन्यांना रात्री उशिरा गळती लागली. गळती लागल्याने तात्काळ आगीने पेट घेतला. गळतीबाबत अनभिज्ञ वाहक त्याच रस्त्यावरून जात होते. आगीने पेट घेताच रत्यावरील धावत्या दोन वाहनांमध्ये आग पसरली. आगीचे लोट परिसरात पसरल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली.

आगीत अरविंद कुमार कैठल (२१), अमन सरोज (२२), सुरेश गुप्ता (५२) हे तिघे जखमी झाले. तसेच, दोन वाहने जळून खाक झाली. प्रसंगावधान दाखवत घटनास्थळी असलेल्या अन्य नागरिकांनी तातडीने जखमींना नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलातर्फे आगीला क्रमांक एकची वर्दी देण्यात आली. प्रयत्नांची पराकाष्ठा करत रात्री १ वाजून ३० मिनिटांनी आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Story img Loader