* दूषित पाणीपुरवठय़ाचा नागरिकांना फटका
दूषित पाणीपुरवठय़ामुळे मुंबईतील काही भागात गॅस्ट्रोची साथ पसरू लागली असून पालिकेकडे नोंद झालेल्या गॅस्ट्रो रुग्णांची संख्या ६०७ वर गेली आहे. मलेरियाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे.

दोन आठवडय़ांपूर्वी गिरगावमधील कुंभारवाडा, डोंगरी परिसरामध्ये पटकीचे (कॉलरा) तीन रुग्ण आढळल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाची एकच पळापळ झाली होती. त्यातच आता गिरगाव, कुंभारवाडा, डोंगरी, उमरखाडी, नळबाजार, भायखळा, कुर्ला परिसरात गॅस्ट्रोच्या साथीचा प्रादुर्भाव झाला असून झोपडपट्टय़ांमध्ये तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आतापर्यंत गॅस्ट्रोची बाधा झालेल्या ६०७ रुग्णांवर पालिका रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्येही मोठय़ा प्रमाणावर गॅस्ट्रोचे रुग्ण जात असून त्यांची नोंद पालिकेकडे नाही. त्यामुळे गॅस्ट्रो रुग्णांची संख्या दीड हजारावर गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जोडीला मलेरियाची साथही हळूहळू डोके वर काढू लागली आहे. जुलैमध्ये पालिका रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये उपचारासाठी आलेल्या २६५ जणांना मलेरिया झाल्याचे आढळले आहे. तसेच मुंबईत डेंग्यूचे १५ रुग्ण सापडले असून त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दूषित पाण्याची बाधा

पटकीचे रुग्ण आढळून आल्यानंतर पालिकेने ठिकठिकाणाहून पाण्याचे तीन हजारांहून अधिक नमुने तपासले होते. या नमुन्यांच्या चाचणीअंती २० टक्के ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले होते. दक्षिण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाण्यातून मोठय़ा प्रमाणावर गाळ आणि अळ्या येत असल्याची तक्रार येत आहे. तर काही ठिकाणी पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. अनेक सोसायटय़ांनी इमारतीमधील पाण्याच्या टाक्यांची सफाई करून घेतली. मात्र, दुषित पाणीपुरवठा होतच आहे. पालिकेकडे तक्रार केल्यानंतर जलविभाग आणि आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात येत आहेत. पाणी दूषित होण्याची शक्यता असलेल्या फुटलेल्या जलवाहिनीत क्लोरिनच्या मात्रेचा मारा करण्यात येत आहे.

 

गॅस्ट्रोची लक्षणे कोणती काळजी घ्यावी

जुलाब होणे   पाणी उकळून गाळून प्यावे

मळमळ वाटणे रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नयेत

मरगळ येणे   जुलाब झाल्यास संजीवनी

ताप येणे     (साखर-मीठ-पाणी) प्यावी