Mumbai Gateway of India Crack : मुंबईत अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ‘गेटवे ऑफ इंडिया’ हे भारताचं प्रवेशद्वार (समुद्रमार्गे) मोठ्या दिमाखात उभं आहे. गेल्या ९९ वर्षांपासून ही वास्तू मुंबईकर आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गेली ९९ वर्षे ही वास्तू समुद्राच्या लाटांचा सामना करत दिमाखात उभी आहे. परंतु नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, या वास्तूच्या भिंतीला तडे गेले आहेत.
गेटवे ऑफ इंजियाच्या भिंतीला तडे गेले आहेत. असं सांगण्यात येत आहे की, या वास्तूच्या स्ट्रक्चरल ऑडिटदरम्यान वास्तूच्या भिंतीला तडे गेल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, आता सरकार या वास्तूच्या जीर्णोद्धाराचा प्रस्ताव स्वीकारेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेटवे ऑफ इंडिया केवळ मुबईचीच नव्हे तर संपूर्ण देशाची ओळख आहे. इंग्रजांनी १९११ साली या वास्तूचं बांधकाम सुरू केलं. १९२४ मध्ये गेटवे ऑफ इंडियाची इमारत उभी राहिली. ४ डिसेंबर १९२४ पासून ही वास्तू सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. या ९९ वर्षे जुन्या संरचनेला आता तडे जाऊ लागले आहेत.
मुंबईच्या अरबी समुद्रात जेव्हा एखादं चक्रीवादळ येतं तेव्हा समुद्राच्या उंच लाटांचा गेटवेला तडाखा बसतो. परंतु आतापर्यंत अनेक चक्रीवादळांना तोंड दिल्यानंतरही गेटवेची वास्तू दिमाखात उभी आहे. परंतु गेल्या वर्षी आलेल्या चक्रीवादळात या संरचनेचं नुकसान झालं होतं. गेल्या आठवड्यात ही बाब सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आता गेटवेच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा >> मुंबई : झोपु सदनिका विक्रीवरील १० वर्षांची अट शिथिल ? पूर्वलक्ष्यी प्रभावाबाबत मात्र संभ्रम
गेटवेचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण
अलिकडेच गेटवेचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. या ऑडिटनुसार इमारतीच्या दर्शनी भागात भेगा पडल्या होत्या. तसेच इमारतीच्या अनेक भागात छोटी रोपं उगवली असल्याचं पाहायला मिळालं. तसेच गेटवेच्या घुमटावरील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचंदेखील नुकसान झालं आहे. त्यानंतर राज्याच्या पुरातत्व विभागाने गेटवेच्या नूतनीकरणासाठी ६.९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, जो अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.