गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एमएम कलबुर्गी या समाजातील लेखक-विचारवंतांची हत्या झाल्यानंतर संशयाची पहिली सुई हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेकडे वळली होती. कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या या दोन संघटना या हत्यांमागे असाव्यात असा अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला होता. पण आता कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने केलेल्या तपासातून हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेला क्लीन चीट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या संघटनेने कोणतेही नाव धारण केलेले नसून या संघटनेचे पाच राज्यात जाळे पसरले आहे. त्यांचे ६० सदस्य आहेत असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था या सारख्या कट्टरपंथीय हिंदुत्ववादी संघटनांमधून लोक या नव्या संघटनेत आले असले तरी या हत्यांमध्ये हिंदू जनजागृती समिती किंवा सनातन या संस्थांचा थेट संबंध नाही असे एसआयटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

नव्या संघटनेचे मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये जाळे पसरले आहे. सुजीत कुमार ऊर्फ प्रवीण नवीन संघटनेसाठी सदस्यांची भरती करायचा. त्याच्या चौकशीतून या सर्व गोष्टीचा उलगडा झाला. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात आली होती. कोल्हापूरात राहणारे गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांची त्यांच्या घराजवळच गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे कुठला तरी एकच गट या हत्येमागे असावा असा सुरुवातीपासून संशय होता.

आता कर्नाटक एसआयटीने गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एमएम कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याचा दावा एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. तिघांच्या हत्येसाठी जे शस्त्र वापरण्यात आले ते अद्याप सापडलेले नाही. बंदुक सापडली नाही तरी शरीरात घुसलेल्या गोळीवरुन कुठली बंदुक असेल त्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येते असे एसआयटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauri lankesh govind pansare and mm kalburgi murder waghmare arrest