कर्मचाऱ्यांच्याच नावावर कर्ज काढणे, त्याचे हप्ते न भरणे, वेळेवर पगार न देणे, कर्मचाऱ्यांना नियमबाह्य़ पद्धतीने निलंबित करणे, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न करणे अशा एन ना दोन अनेक तक्रारी असलेल्या सातारा येथील गौरीशंकर तंत्रनिकेतन कॉलेजला राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने चौकशी करून तात्काळ सुधारणा न केल्यास सलग्नता रद्द करणे तसेच प्रशासक नियुक्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
सातारा येथील गौरीशंकर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कर्मचारी-शिक्षकांना सेवेत घेतल्यानंतर संस्थेने त्यांच्या नावावर लाखो रुपयांची कर्जे काढली. या कर्जाची परतफेड करण्याची हमी संस्थेने दिली असली तरी कर्जफेड न झाल्याने बँका अथवा पतसंस्थांनी संबंधित कर्जदाराला नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे संस्थेतील ३८१ कर्मचाऱ्यांकडून सात कोटी ११ लाख रुपये रोख घेतले असून ते परत करण्याबाबत सानुग्रह अनुदानाचा करारही ‘टेफनॅप’ संस्थेबरोबर २०१३ रोजी केला होता. नऊ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य़ निलंबित करण्यात आले असून कर्मचाऱ्यांना दोन ते तीन महिने वेतन न देणे तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरणे आदी अनेक तक्रारी यापूर्वीही संस्थेचे कर्मचारी तसेच ‘टेफनॅप’ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक वैद्य यांनी केल्या आहेत. याची दखल घेऊन यापूर्वी तंत्रशिक्षण संचालनालयाने नेमलेल्या कराड शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर.जे. बलवान यांच्या चौकशी समितीने बऱ्याच तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याचे नमूद केले आहे. या साऱ्याचा विचार करून विभागीय कार्यालय पुणे येथील सहसंचालक प्राध्यापक डॉ. दिलीप नंदनवार यांनी गौरीशंकर पॉलिटेक्निकचे संस्थाचालक, प्राचार्य व पदाधिकारी तसेच तक्रारदार यांची एकत्रित बैठक घेऊन सर्व प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी केली. या चौकशीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याचे व त्याची माहिती संचालनालयाला कळवणे, कर्मचारी निलंबनाची कारवाई नियमबाह्य़ असल्यामुळे तात्काळ कर्मचाऱ्यांना कामावर घेणे, भविष्य निर्वाह निधीचा संस्थेचा हिस्सा भरणे, कर्मचाऱ्यांच्या नावे घेतलेले कर्ज फेड करणे व त्यांना बँकेकडून कोणताही त्रास होणार नाही, याची हमी घेण्याचे आदेश दिले.
डॉ. नंदनवार यांनी आपल्या अहवालात या साऱ्याची अंमलबजावणी न झाल्यास संस्थेची सलग्नता रद्द करणे तसेच संस्थेवर प्रशासक नियुक्तीच्या कारवाईची प्रक्रिया केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. डॉ. नंदनवार यांनी केलेल्या धडक कारवाईप्रमाणेच ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांबाबत गंभीर तक्रारी असल्याचे दिसून आले आहे, तेथेही विभागीय सहसंचालकांच्या माध्यमातून कारवाई करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.