निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्यावर दुसऱ्या पक्षात आश्रय घेणाऱ्यांची स्पर्धाच जणु गल्लीपासून दिल्लीपर्यंत लागल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यास आता उणेपुरे पंधरा दिवस उरले असतानाच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांत जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
अखेर हीना गावित भाजपमध्ये
राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करून आयाराम-गयारामांमध्ये आणखी भर पडली. तर काँग्रेस नेते जगदंबिका पाल, हास्य अभिनेता राजू श्रीवास्तव, भिवंडीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख योगेश पाटील, अभिनेते अमोल कोल्हे अशा नेते-अभिनेत्यांच्या पक्षांतराने बुधवारचा दिवस गाजवला.
काँग्रेसला शह देण्यासाठीच गावित यांचे मंत्रिपदावर पाणी!
राष्ट्रवादीचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जिल्हाध्यक्ष हिना गावित यांनी नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना लगेचच नंदुरबार मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर करून टाकली. हिना गावित या काँग्रेसचे नंदुरबारमधील उमेदवार माणिकराव गावित यांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. मात्र, त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे त्यांचे वडील विजयकुमार गावित यांच्यावर राष्ट्रवादीकडून कारवाई होण्याचे संकेत आहेत.
‘आयारामां’ना भाजपचा ‘लाल गालिचा’
नंदुरबारप्रमाणेच भिवंडीमध्येही भाजपला राष्ट्रवादीमधून उमेदवार आयात करावा लागला. राष्ट्रवादीचे कपिल पाटील भाजपच्या तंबूत दाखल झाले आणि त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. मात्र, यामुळे नाराज झालेले कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक आणि ठाणे जिल्हा शिवसेना ग्रामीणचे संपर्कप्रमुख माजी आमदार योगेश पाटील यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हाच योगेश पाटील राणे यांना साथ देणार अशी चर्चा होती. यामुळेच आपल्या काँग्रेस प्रवेशाला थोडा विलंब लागल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले.
उमेदवारी नाकारल्याने मावळचे शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत बाबर यांच्या भावाने भाजपचा त्याग करीत मनसेचा मार्ग पत्करला. तर मावळमध्ये मनसेने देऊ केलेली उमेदवारी नाकारत ‘शिवराय’फेम अभिनेते अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंवर टीका करत शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच, शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून मावळची उमेदवारी पटकावली होती.

Story img Loader