देशभरात लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मुंबईत पक्षाची आगामी रणनिती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आज (शनिवारी) ही बैठक घेण्यात आली. यात लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निहाय आढावा घेतला गेला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाला किमान १० ते १२ जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला. याचबरोबर निकाल काय लागायचा तो लागू द्या, आता पुढील काळात फटाफट निर्णय घ्या व विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित मंत्र्यांना व नेत्यांना दिले आहेत.  प्रलंबित निर्णय लवकर घ्या, तसेच लोकसभा मतदानाचा निर्णय लागल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूक तयारीसाठी मंत्र्यांनी राज्यभर दौरे करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.
या बैठकीस पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, गोविंदराव आदिक, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, आमदार हेमंत टकले, वसंत डावखरे, दिलीप वळसे पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा