मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी मुंबई विभागातील ३, पुणे विभागातील ४, सोलापूर विभागातील दोन, नागपूर आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्याला सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले.मागील महिन्यात कर्तव्यादरम्यान सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल या कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्रक आणि रोख दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
वाशी येथे मास्टर क्राफ्ट्समन अरुण कुमार पंडित यांना नियमित तपासणीदरम्यान रूळाला तडा गेल्याचे आढळले. सुरक्षा नियमांचे पालन केल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व संबंधितांना माहिती दिली आणि योग्य ती कारवाई केल्यानंतर, या विभागातील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. त्यांच्या निरीक्षणामुळे संभाव्य अपघात टळला.रुळाला तडा गेल्याचे पेण येथीस पॉइंट्समन राजन सिंग यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने स्थानक व्यवस्थाक व संबंधित विभागाला सतर्क केले आणि सुरक्षा नियमांचे पालन केल्यानंतर तडा गेलेल्या रुळाची दुरुस्ती करण्यात आली. त्यांच्यामुळे संभाव्य अपघात टळला.
दातिवली येथील इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर दीपक कुमार यांना नियमित तपासणीदरम्यान रूळाला तडा गेल्याचे आढळले. सुरक्षा नियमांचे पालन केल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व संबंधितांना माहिती दिली आणि योग्य ती कारवाई केल्यानंतर, या विभागातील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. त्यांच्यामुळे संभाव्य अपघात टळला.