प्रसिद्धीमुळे औषधांच्या मागणीत मोठी वाढ; आवक घटल्याने नागरिकांचे हाल
सामान्य नागरिकांना महागडी औषधे स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी ‘जन औषधी केंद्र’ सुरू करण्यात आली असली, तरी पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना वेळेत औषधांचा पुरवठा होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
२००८ सालापासून देशभरात जनऔषधी प्रकल्प राबविला जात आहे. मात्र २०१६ साली केंद्र सरकारने जेनेरिक औषधांच्या वापरासंदर्भात परिपत्रक काढल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असल्या तरी यानिमित्ताने जेनेरिक म्हणजेच ‘जनौषधीं’च्या होणाऱ्या प्रसिद्धीमुळे या औषधांना कधी नव्हे ती मागणी वाढली आहे. मात्र मुंबईतील अनेक जनऔषधी केंद्रामध्ये औषधांचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे ग्राहकांना जनऔषधी केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. जनऔषधी केंद्रातील औषधांचा साठा संपल्यानंतर अनेकदा विचारणा करूनही सांगितलेली औषधे उपलब्ध होत नाहीत, असे मुंबईतील जनऔषधी केंद्र चालकांनी सांगितले.
जेनेरिक औषधांमुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात औषधे उपलब्ध होतात. अनेकदा हजारोंमध्ये असलेली औषधे काही शे रुपयांमध्ये रुग्णांना उपलब्ध होत असल्यामुळे आर्थिक चणचण असलेल्यांसाठी हा प्रकल्प फायदेशीर आहे. जनऔषधी केंद्र सुरू झाल्यानंतर ग्राहक औषधे घेण्यासाठी पुढे येत नव्हते. मात्र गेल्या दोन वर्षांत ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे खप वाढला आहे. मात्र त्यातुलनेत औषधांची आवक होत नाही. अनेक केंद्रांमध्ये तर अॅसिडिटी, मधुमेह आदी साधी औषधेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे जेनेरिक औषधांवर विश्वास ठेवून आलेल्या ग्राहकांची गैरसोय होते, असे कांदिवली जनऔषधी केंद्राच्या रुचा माने यांनी सांगितले.
हीच परिस्थिती कल्याण भागातील जनऔषधी केंद्रातही आहे. येथेही औषधांची मागणी केल्यानंतरही अनेक दिवसांनी काही टक्केच औषधे केंद्रात येतात. जनऔषधी केंद्रातील निम्मा ग्राहक हा वयोवृद्ध आहे. अनेकदा लांबून किंवा प्रवासासाठी पैसे खर्च करून केंद्रात औषधे खरेदी करण्यासाठी येतात. मात्र औषधांचा साठाच नसल्याने त्यांना औषधे मिळत नाहीत. यातून ग्राहक तुटण्याची शक्यता अधिक आहे. ‘बीपीपीआय’ या जेनेरिक औषधे पुरविणाऱ्या संस्थेला १०० टक्के ऑर्डर दिल्यानंतर केवळ ३० ते ४० टक्के औषधांची आवक होते. त्यामुळे सध्या केंद्रात अनेक कफ सिरप, मिश्र औषधे, मलमे उपलब्ध नाहीत. दुसरीकडे औषधांचा खप झाला नाही तर दुकानाचे भाडे देणेही कठीण जाते, असे कल्याण येथे तीन महिन्यांपूर्वी जनऔषधी केंद्र चालविणाऱ्या कांचन येवले यांनी सांगितले.
निधीचीही कमतरता
अनेक जनऔषधी केंद्रांमध्ये औषधांचा साठा उपलब्ध नाही ही बाब खरी आहे. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आवश्यक निधीही सरकारकडून पुरवला जात नसल्यामुळे ही प्रकल्पाची तयारी अपुरी पडत आहे. सर्वसामान्यांना जेनेरिक औषधे उपलब्ध झाली तर सोयीचे होईल, मात्र हा प्रकल्प राबविण्यासाठी नियमावली व सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही, असे जनआरोग्य अभियानाचे डॉ. अनंत फडके यांनी सांगितले. सध्या देशभरात नवीन जनऔषधी केंद्रे सुरू होत आहेत, त्यामुळे आजही पूर्वीच्या मागणीनुसार औषधं तयार केली जात आहेत. जनऔषधी केंद्रांची संख्या वाढल्यामुळे सर्वच केंद्रांच्या मागणीनुसार औषधांचा साठा पुरविण्यात अडथळा येतो, असे जनऔषधी केंद्रांच्या मुंबईचे प्रमुख अन्वय बक्षी यांनी सांगितले.