मुंबई…कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेत मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) लावण्यात आलेल्या झाडांची संपूर्ण माहिती आता नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे. एमएमआरसीने मेट्रो ३ मार्गिकेत लावण्यात आलेल्या वा पुनर्रोपित करण्यात आलेल्या झाडांच्या जिओ टॅगिंगचे काम हाती घेतले आहे. या जिओ टॅगिंगच्या माध्यमातून झाडांवरील क्यु आर स्कोड स्कॅन करून नागरिकांना झाडाच्या नावापासून ते झाडांच्या उंचीपर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. जिओ टॅगिंगचे काम वेगात सुरु असून आतापर्यंत २००० हून अधिक झाडांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> तळोजा कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी व पोलीस शिपायाला अटक; १० हजारांची लाच घेतल्याचा आरोप, एसीबपीची कारवाई

मेट्रो ३ मार्गिकेसाठी आणि आरे कारशेडसाठी मोठ्या संख्येने झाडे कापण्यात आली आहेत. या झाडांच्या कत्तलीवरुन मोठा वादही निर्माण झाला आहे. नियमानुसार झाडे कापणाऱ्या यंत्रणेला कापण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात काही पट झाडे लावावी आणि ती जगवावी लागतात. अशावेळी एमएमआरसीकडून लावण्यात आलेल्या आणि पुनर्रोपित करण्यात आलेल्या झाडांबाबत वाद आहे. पर्यावरणप्रेमींकडून त्यावर नेहमीच आक्षेप घेतला जातो. या पार्श्वभूमीवर आता झाडांच्या पुनर्रोपण प्रक्रियेत पारदर्शकता यावी, एमएमआरसीने कुठे आणि कोणती झाडे लावली आहेत त्याची इत्यंभूत माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी यासाठी नव्याने लावण्यात आलेल्या झाडांसह पुनर्रोपित झाडांचे जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे. त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून मेट्रो ३ मार्गिकेदरम्यान, मेट्रो स्थानकाबाहेर लावण्यात आलेल्या सर्व झाडांच्या जिओ टॅगिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा >>> वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू : पाच वर्षात केवळ २३ टक्के काम पूर्ण, प्रकल्प पूर्णत्वासाठी मे २०२८ उजाडणार

आतापर्यंत एमएमआरसीकडून २०००हून अधिक झाडांचे जिओ टॅगिंग पूर्ण करण्यात आले आहे. त्यावर क्यू आर कोड लावण्यात आला असून उर्वरित झाडांवर क्यू आर कोड लावण्याचे काम सुरु आहे. झाडावरील क्यू आर कोड स्कॅन करून नागरिकांना झाडांची उंची, आकार, प्रजाती, नाव आणि इतर संबंधित माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एमएमआरसीने किती आणि कोणती झाडे लावली आहेत याची माहिती उपलब्ध होईल आणि झाडांच्या पुनर्रोपण प्रक्रियेत पारदर्शकता येईल असे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे. दरम्यान झाडांवर लावण्यात आलेल्या क्यू आर कोडला नागरिकांनी हात लावू नये, क्यू आर कोड फाडू नये असे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geo tagging of trees planted on metro 3 route information about trees by scanning qr code mumbai print news zws