पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटातील साक्षीदारांचा छळ करून त्यांच्याकडून राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी मनाजोगता जबाब नोंदवून घेतल्याचा आरोप करीत आशिष खेतान या पत्रकाराने त्याच आधारे स्वतंत्र यंत्रणेकडून खटल्याच्या पुनर्तपासाची मागणी सोमवारी उच्च न्यायालयाकडे केली.
खटल्यातील मुख्य आरोपी हिमायत बेग याने कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या अपिलावर न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. खेतान यांनी साक्षीदारांची एटीएसकडून साक्षीदारांची छळवणूक होत असल्याचा आरोप या प्रकरणी हस्तक्षेप याचिकेद्वारे करीत स्वतंत्र यंत्रणेद्वारे प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली. मात्र फाशीची सुनावण्यात आलेल्या प्रकरणात अशाप्रकारे हस्तक्षेप याचिका करता येते की नाही हे पाहणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी ७ ऑक्टोबपर्यंत तहकूब केली. खटल्यासाठी एटीएसने बनावट कागदपत्रांच्या आधारे पुरावे सादर केले आणि साक्षीदारांचीही छळवणूक करून स्वत:ला हवे तसे त्यांचे जबाब नोंदवून घेतल्याचा आरोप खेतान यांनी याचिकेत केला आहे. याप्रकरणी आपण ‘स्टिंग ऑपरेशन’ केले होते. त्यातून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे बेगला खटल्यात दोषी ठरविल्याप्रकरणी आणि त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेबाबतही खेतान यांनी संशय व्यक्त केला आहे.

आरोपींची जामिनासाठी धाव
२०१२ मध्ये पुण्यामध्ये घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटातील असद खान आणि इमरान खान या इंडियन मुजाहिदीनच्या दोन संशयित दहशतवाद्यांनी सोमवारी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. नियमित वेळेत तपास यंत्रणेने आपल्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती दोघांनीही केली आहे.