जागतिक साहित्यातील उत्तमोत्तम पुस्तके मराठी भाषेत आणण्याच्या दृष्टीने आपल्याकडे वानवा असली तरी आता जर्मन व रशियन भाषांमधील काही निवडक दुर्मीळ अभिजात पुस्तके वाचकांना मराठीतून वाचायला मिळणार आहेत. गेली काही वर्षे ‘केल्याने भाषांतर’ या त्रमासिकाच्या माध्यमातून परदेशी भाषांमधील साहित्य मराठीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रा. विद्यासागर महाजन व प्रा. सुनंदा महाजन यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून मराठी वाचकांसमोर हे साहित्य आणले आहे. यात जर्मन भाषेतील तीन लघुकादंबऱ्या, एक कथासंग्रह तसेच रशियन भाषेतील प्रसिद्ध लेखक-नाटककार चेखवच्या कथा नाटकांचे संकलन तर तुर्गेन्येव या लेखकाच्या दीर्घकथांच्या संग्रहाचा समावेश आहे.
यातील ‘तीन जर्मन लघुकादंबऱ्या’ या पुस्तकात जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्र्झलड या तीन जर्मन भाषिक देशांमध्ये वेगवेगळ्या काळात प्रकाशित झालेल्या तीन लघुकादंबऱ्यांचा समावेश आहे. हाईनरीश फॉन क्लाईस्ट या लेखकाने सन १८०७ मध्ये लिहिलेल्या कादंबरीचा ‘चिलीमधला भूकंप’ या नावाने प्रा. विद्यासागर महाजन यांनी अनुवाद केला आहे. तर प्रा. सुनंदा महाजन यांनी गोटफ्रीड केलर या लेखकाची सन १८७४ मध्ये लिहिलेल्या कादंबरीचे ‘दिसते तसे नसते’ व श्टेफान त्स्वाईग या ऑस्ट्रीयन-जर्मन लेखकाने १९४२ साली लिहिलेल्या कादंबरीचे ‘बुद्धिबळाची गोष्ट’ या नावाने अनुवाद केला आहे. या जुन्या काळातील लेखनाबरोबरच सध्या जर्मन भाषेत गाजत असलेली लेखिका युडीथ हेरमन हीच्या ‘समरहाऊस स्पॅटर’ या बर्लिन शहराच्या भावविश्वाशी जोडलेल्या तरुणांच्या जीवन जाणिवांभोवती गुंफलेल्या कथांचा ‘लाल प्रवाळ आणि इतर कथा’ या नावाने प्रा. सुनंदा महाजन यांनी केलेला अनुवादही लवकरच वाचायला मिळणार आहे.
याशिवाय इवान तुर्गेन्येव या १९व्या शतकातील रशियन लेखकाच्या तीन दीर्घकथांचा ‘पोवेस्ती’ हा कथासंग्रह अनघा भट व अनुराधा सोमण यांनी अनुवादित केला आहे. भट यांनी संपादन केलेल्या चेखव या रशियन लेखक-नाटककाराच्या कथा, नाटके, एकांकिकांचे अनुवादित संकलन व डॉ. दीप्ती गंगावणे यांनी लिहिलेले ‘युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाऊलखुणा’ हे युरोपीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे पुस्तकही वाचकांच्या भेटीला येत आहे.
मूळ भाषेतूनच थेट अनुवादित
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत इंग्रजीबरोबरच जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, जपानी या भाषांतील साहित्यही जगभरातील वाचकांच्या पसंतीला उतरत असून अशा साहित्याचा मराठीमध्ये अनुवाद करण्याची गरज आहे. गेली १६-१७ वर्षे टॉलस्टॉय, पुश्कीन, मोपासा, गटे, माक्र्वेझ आदी अभिजात लेखकांचे साहित्य ‘केल्याने भाषांतर’ या त्रमासिकाने थेट मराठीमध्ये अनुवादित केले आहे. आपल्याकडे नेहमीच मूळ साहित्य कृतीच्या इंग्रजी अनुवादावरून मराठीत अनुवाद केला जातो. परंतु ही पुस्तके सरळ मूळ भाषेतूनच अनुवादित केली असल्याने साहित्यकृतीच्या आशयाला, भाषेला सकसपणे मराठीत उतरवता आले.
-प्रा. सुनंदा महाजन, संपादक, केल्याने भाषांतर