प्रसिद्ध उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांचाही पुरस्काराने सन्मान
‘सात सक्कं त्रेचाळीस’ या दमदार कादंबरीतून मराठी साहित्यविश्वात आपली स्वतची वाट आखणारे चतुरस्र साहित्यिक किरण नगरकर आणि प्रसिद्ध उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांना बुधवारी एका शानदार समारंभात जर्मनीच्या ‘ऑर्डर ऑफ दी मेरीट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या कामातून भारत आणि जर्मनी यांच्यातील सांस्कृतिक व औद्योगिक संबंध दृढ करण्यात हातभार लावल्याबद्दल नगरकर आणि कल्याणी या दोघांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जगात ज्या मराठी साहित्यिकांचे नाव आदराने घेतले जाते अशा मोजक्या सर्जनशील साहित्यिकांमध्ये नगरकर यांची गणना होते. ‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘रावण आणि एडी’, ‘ककोल्ड’, ‘गॉड्स लिटल सोल्जर’ या नगरकर यांच्या काही गाजलेल्या साहित्यकृती. त्यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘द एक्स्ट्रॉज’ हे पुस्तक सोडून सर्व कादबऱ्यांचे जर्मनीत भाषांतर झाले आहे. त्यांच्या ‘गॉड्स.’ या पुस्तकाने तर जर्मनीत विक्रीचा उच्चांक गाठला आहे.
मुंबई-पुण्यात शिकलेल्या नगरकर यांचा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. नगरकर यांच्या साहित्यकृती जर्मनीत चांगल्याच गाजल्या आहेत. नगरकर यांच्या बरोबरच बाबासाहेब कल्याणी हे प्रसिद्ध उद्योगपतीही जर्मनीशी व्यवसायाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत.
नगरकर यांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीच्या गेल्या सत्तावीस वर्षांत मोजक्याच प्रती विकल्या गेल्या, पण मराठी साहित्यावर या कादंबरीने विलक्षण छाप पाडली.
कठोर समीक्षेमुळे या कादंबरीला फारसा वाचकवर्ग लाभला नाही, पण इंग्रजी अनुवादाला मात्र काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले. ही त्यांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरूची’मध्ये प्रसिद्ध झाली होती. १९७४ मध्ये ‘मौज प्रकाशन’ने ती प्रकाशित केली. नंतर थेट २००४ मध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
नगरकर यांच्या ककोल्ड या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांची द एक्स्ट्राज ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. मोजक्या कादंबऱ्या लिहूनही स्वतचा असा वाचकवर्ग तयार करणारे साहित्यिक म्हणून नगरकरांना साहित्यविश्वात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.
जर्मनीचे राजदूत मायकेल स्टेनर यांच्या हस्ते नगरकर आणि कल्याणी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘जर्मनीचे भारताशी असलेले संबंध कुठल्याही राजकीय संबंधांच्या पलिकडे आहेत.  कला, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, व्होकेशनल ट्रेनिंग या क्षेत्रात भारत-जर्मनीने सौदार्ह आणि मैत्रीचे संबंध दृढ केले आहेत,’ असे उद्गार स्टेनर यांनी यावेळी काढले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा