महानगर आयुक्तांच्या जर्मनी दौऱ्यात केएफडब्लू बँकेशी सकारात्मक चर्चा
मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ आणि ‘कासारवडवली – गायमूख मेट्रो ४ अ’ मार्गिकांसाठी जर्मनीकडून कर्जरूपाने आर्थिक मदत मिळणार आहे. जर्मनीतील कर्जपुरवठा करणाऱ्या केएफडब्लू बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच महानगर आयुक्तांनी सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे लवकरच सुमारे ४,१८९ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या कर्जातून ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांतील सिग्नल, विद्युत यंत्रणा आदी विविध कामे करण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबई : पुन्हा धुळधाण सुरू; शिवाजी पार्कमधील धुळीचा रहिवाशांवर मारा
‘एमएमआरडीए’ मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो, सागरी मार्ग, सागरी सेतू, उन्नत मार्ग, भुयारी मार्ग, उड्डाणपूल आदी विविध प्रकल्प राबवित आहे. हे प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्चाचे असून ‘एमएमआरडीए’ या प्रकल्पांसाठी कर्ज रुपाने निधी उभारत आहे. आजघडीला ‘जायका’कडून कर्ज घेऊन अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. जर्मनीतील आघाडीच्या केएफडब्लू बँकेने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांसह बहुउद्देशीय प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करण्यास, कर्ज देण्यास २०१९ मध्येच उत्सुकता दर्शविली होती. राज्य सरकार आणि बँकेमध्ये २ नोव्हेंबर २०२० रोजी याबाबत करारही झाला होता. ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ प्रकल्पासाठी सुमारे ४,१८९ कोटी कर्ज देण्याचे निश्चित झाले. मात्र अद्यापपर्यंत हे कर्ज उपलब्ध झालेले नाही. आता लवकरच हे कर्ज उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई : कूपर रुग्णालयातून पळून जाण्याचा आरोपीचा अयशस्वी प्रयत्न; आरोपीविरोधात १४ गुन्हे
जर्मनी दौऱ्यात केएफडब्लू बँकेशी सकारात्मक चर्चा झाली. बँकेकडून लवकरच कर्ज उपलब्ध होणार असून ही रक्कम ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांतील विविध यंत्रणांच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम सध्या वेगात सुरू असून निर्धारित वेळेत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे ‘एमएमआरडीए’चे नियोजन आहे. मार्गिकेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सिग्नल, विद्युत आणि इतर यंत्रणांच्या कामास सुरुवात करणे आवश्यक आहे. या कामासाठी वेळेत कर्ज उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीनिवास यांनी जर्मनी दौऱ्यात केएफडब्लू बँकेतील अधिकाऱ्यांची चर्चा केली.