अक्षय मांडवकर

पक्षीनिरीक्षक, पर्यावरणप्रेमींच्या प्रयत्नांना यश

मासेमारीच्या जाळ्यात पाय अडकल्यामुळे उडू न शकणाऱ्या रोहित पक्ष्याची मुंबईतील पक्षीप्रेमींनी सुटका केली आहे. समाजमाध्यमांवर या पक्ष्याची छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर पक्ष्यांच्या थव्यातून त्याला शोधून काढून जाळ्यातून मुक्त करण्यात आले. उपचार करून त्याची सुटका करण्यात आली आहे.

दरवर्षी हिवाळ्यात लाखोच्या संख्येत रोहित पक्षी (फ्लेमिंगो) मुंबईतील पाणथळ क्षेत्रात स्थलांतर करतात. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे यंदा मुंबईत सुमारे १ लाख २१ हजार फ्लेमिंगोंनी स्थंलातर केले. नोव्हेंबरच्या सुमारास आलेले हे पक्षी मे ते जून दरम्यान मायदेशी परततात. या दरम्यान अनेक पक्षी जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. अशाच प्रकारे मासेमारीसाठी वापरण्यात येणारे जाळे पायात अडकून जायबंदी झालेल्या एक  पक्ष्याचे छायाचित्र नवी मुंबईच्या रहिवासी सीमा यांनी सीवूड्स येथील पाणथळ क्षेत्रात २८ जानेवारीला टिपले होते. लंगडत चालणाऱ्या या पक्ष्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यास तो उडून जात होता, त्यामुळे त्याला वाचवणे कठीण होते. फेब्रुवारीत ‘विवांत अनटेम्ड अर्थ फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. संजीव शेवडे यांनी देखील त्याचे छायाचित्र टिपले आणि पर्यावरणप्रेमी रोहित जोशी आणि सुनील अग्रवाल यांच्या मदतीने नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांच्या समाजमाध्यमांवरील ग्रुपवर पाठवले. यामुळे या पक्ष्याला शोधण्याची मोहीम सुरू झाली.

शनिवारी पक्षीनिरीक्षक कैलाश पाटील यांना पायांमध्ये जाळे अडकलेला हा रोहित पक्षी नवी मुंबईत आढळला. दलदलीचा परिसर असल्याने पाटील यांनी मच्छीमारांच्या मदतीने त्याला पकडून ‘रॉ’ या प्राणीप्रेमी संस्थेच्या ताब्यात दिल्याची माहिती पर्यावरणप्रेमी ज्योती नाडकर्णी यांनी दिली. ठाण्याच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून रविवारी कांदळवन संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याची सुटका केल्याची माहिती ‘रॉ’ संस्थेचे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली.

Story img Loader