भारताला पुन्हा एकदा ‘हिंदुराष्ट्र’ बनवण्याच्या उद्देशाने हिंदुत्ववादी संघटना मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांना हिंदू धर्मात आणण्यासाठी ‘घरवापसी’ मोहीम राबवत असतानाच, हिंदू धर्मातील अनेक कुटुंबे ‘घरवापसी’ करून बौद्ध धर्मात जाण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी (इतर मागासवर्गीय) जातींमधील १६०० कुटुंबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी नोंदणी केली असून यामध्ये ब्राह्मण आणि मराठा जातीच्या कुटुंबांसह मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांचाही समावेश आहे. त्यांची संख्या सुमारे सहा हजार असल्याचे समजते. ओबीसी हे पूर्वी बौद्धच होते, त्यामुळे हे धर्मातर नसून स्वगृही परतणे आहे, असा त्यांचा दावा आहे.
भारतातील ओबीसींच्या अवनतीला हिंदूू धर्मातील जातीव्यवस्था कारणीभूत आहे, त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग हाच ओबीसींच्या उन्नतीचा मार्ग आहे, अशी भूमिका घेऊन ओबीसी नेते हनुमंत उपरे यांनी १४ ऑक्टोबर २०११ पासून ओबीसींच्या धर्मातरासाठी जनजागृती चळवळ सुरू केली. ‘ओबीसी बांधव आता धम्माच्या वाटेवर’, अशी घोषणा देत गेल्या तीन वर्षांत या चळवळीने महाराष्ट्र पिंजून काढला. सहा विभागांवर परिषदा आणि कार्यशाळा घेतल्या. १४ ऑक्टोबर २०१६ला ज्यांची धर्मातराची तयारी आहे, त्यांची नोंदणी सुरू केली. त्यानुसार आतापर्यंत १६७७ कुटुंबांची धर्मातरासाठी नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही ब्राह्मण, मुस्लीम, ख्रिचन व मराठा समाजातील कुटुंबेही पुढे आली आहेत. त्यांचीही नोंदणी करण्यात आली आहे, असे उपरे यांनी सांगितले.
‘घरवापसी’ करणारी कुटुंबे
बांजारा-लमाण- ४१५, भावसार- २५०, हाटकर- ७०, गुरव- ५०, परीट- ५०, नाभिक- ५०, माळी- ४०, कुंभार- २५, तेली- २५, सोनार- १५, कोष्टी- १०, महादेव कोळी- १०, आगरी- १०, कुणबी- ५, साळी- १०, निराळी- ५, पानवाले- २, राजपूत- २, वडर- १००, धनगर- ५०, पारधी- २५, औंध (आदिवासी)- २०, भटके-विमुक्त- ५०, वाल्मीकी- ६, घिसाडी- २, मातंग- २५०, चर्मकार- ५०, ख्रिश्चन- ५०, मुस्लीम- ३, ब्राह्मण- २, मराठा- ५०
ओबीसींच्या धर्मातराची चळवळ करीत असताना, त्यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जुन्या ऐतिहासिक दस्तावेजांबरोबरच पारंपरिक पद्धतीने (परंतु नोंदी असलेली) वंशावळ तपासली, तर भारतातील साऱ्या ओबीसी जाती नागवंशीय म्हणजे बौद्ध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ओबीसी पुन्हा आपल्या घरात जात आहेत, म्हणजे ही आमची घरवापसीच आहे.
– हनुमंत उपरे, अध्यक्ष-सत्यशोधक ओबीसी परिषद.