मुंबई : ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांर्तगत यंदा नागरिकांना मोफत राष्ट्रध्वज देण्यात येणार नसून नागरिकांना राष्ट्रध्वज विकतच घ्यावे लागणार आहेत. ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘तिरंगा मेळा’चे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या बाजार विभागाच्या वतीने २५ मंडईंमध्ये, तर विविध विभाग कार्यालयांच्या परिसरामध्ये ९२ ठिकाणी विशेष विक्री दालने सुरू करण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये राष्ट्रध्वज, सजावटीच्या वस्तू आदी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यंदा ‘घरोघरी तिरंगा’ राज्यस्तरीय अभियानाला ९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबईत तिरंगा रॅली, तिरंगा शपथ, तिरंगा यात्रा, तिरंगा मेळा, मानवंदना सोहळा आदी उपक्रम राबविण्यात आले. घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान नागरिकांनी आपापल्या घरी सन्मानपूर्वक तिरंगा फडकवावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ५९ पोलिसांना पदके जाहीर, मुंबईतील सदानंद राणे, हातिस्कर व होनमाने यांचा समावेश

हेही वाचा – ‘एनआयआरएफ’मध्ये मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालय ८९ व्या स्थानी

मुंबई महानगरपालिकेने २०२२ मध्ये नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध केले होते. तसेच राष्ट्रध्वजांचा योग्य सन्मान करून ते सुस्थितीत जपून ठेवण्याचे आवाहनही केले होते. नागरिकांनी यंदा त्यांच्याकडे सुस्थितीत असलेले ध्वज फडकवावे. ध्वज उपलब्ध नसल्यास जवळचे विभाग कार्यालय, तसेच मंडईंमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा मेळा’मधून किंवा नजीकच्या टपाल कार्यालयातून राष्ट्रध्वज विकत घेऊन आपल्या घरावर फडकवावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २३ प्रशासकीय विभागात विविध ठिकाणी ‘तिरंगा मेळा’ भरविण्यात आला आहे. या तिरंगा मेळ्यातील केंद्रांमध्ये राष्ट्रध्वज, बिल्ले, सजावटीच्या वस्तू आणि कपडे आदी साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gharoghari tiranga campaign citizens will be able to buy the national flag not for free mumbai print news ssb