मुंबई : इमारतीच्या आवारात खेळत असताना पाण्याच्या टाकीत बुडून एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी येथे घडली होती. सोसायटीच्या निष्काळजीपणामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यानुसार पंतनगर पोलिसांनी सोसायटीच्या पाच पदाधिकाऱ्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. सचिन वर्मा (८) असे या मृत मुलाचे नाव असून तो घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरातील कामराज नगर येथे राहत होता.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा मुलगा तेथील शांतीनगर सोसायटीच्या परिसरात खेळत होता. त्यावेळी तेथील एका जुन्या पाण्याच्या टाकीत हा मुलगा पडला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी तत्काळ ही माहिती परिसरातील नागरीकांना दिली. त्यानुसार त्याला बाहेर काढून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
ॉ
सोसायटीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ही टाकी उघडी ठेवण्यात आली होती. त्यामुळे या घटनेला सोसायटी जबाबदार असल्याचा आरोप मुलाच्या वडीलांनी केला आहे. त्यानुसार त्यांनी याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही तत्काळ सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार यांच्यावर रात्री गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.