मुंबई : घाटकोपर पूर्व येथील ‘विश्वास’ इमारतीच्या मजल्यावरील जुनो पिझ्झा हॉटेलला लागलेल्या आगीत १४ जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. तर १३ पैकी सात जखमींच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. राजावाडी रुग्णालयात दाखल असलेल्या एकाची प्रकृती गंभीर असून उर्वरित चौघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टारांनी सांगितले. तसेच एका रुग्णाला ऐरोली येथील बर्न रुग्णालयात हलविण्यात आले.
घाटकोपर (पूर्व) परिसरातील ‘विश्वास’ इमारतीच्या तळमजल्यावरील जुनो पिझ्झा हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी लागलेल्या आगीची याच इमारतीतील पारेख रुग्णालयालाही बसली. या रुग्णालयातील २२ जणांना तात्काळ अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. जखमींना घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात हलविण्यात आले असून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १३ पैकी सात जणांना उपचार केल्यानंतर घरी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर एक जण गंभीर असून चार जणांची प्रकृती स्थिर आहे. एका जखमीला राजवाडीतून ऐरोली बर्न रुग्णालयात हलविण्यात आले.
या दुर्घटनेत होरपळल्याने कोरशी डेधिया (४६) यांचा मृत्यू झाला. तर १८ ते २० टक्के भाजलेल्या तानिया कांबळे (१८) यांना बर्न रुग्णालयात हलविण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. तसेच आदित्य साहाथिया (१४) याचीही प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरलेले जय यादव (५१), संजय तडवी (४०), नितीन वेसावकर (३५), प्रभू स्वामी (३८) यांच्यावर रुग्णालयात उपाचर सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर उपचाराअंती प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तुकाराम घाग (४०), शेर बहादूर परिहार (४६), कुलसुम शैख (२०), सना खान (३०), हितेश करानी (४९), के. पी. सुनार (४२) आणि अनिल गोविंद मदगे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.